धर्मशाला : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा दारुण पराभव झाला होता. एकतर्फी झालेल्या या मॅचमध्ये श्रीलंकेचा ७ विकेटनं विजय झाला. या विजयाबरोबरच श्रीलंकेनं ३ वनडेच्या सीरिजमध्ये १-०नं आघाडी घेतली आहे.
विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्य रहाणेला वनडे टीममध्ये संधी मिळेल असं बोललं जात होतं. पण रोहित शर्माच्या नेतृत्वात मैदानात उतरलेल्या टीममध्ये अजिंक्य रहाणेला संधी देण्यात आली नाही. याबाबत खुद्द रोहित शर्मानंच प्रतिक्रिया दिली आहे.
मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमध्ये अजिंक्य रहाणेला आम्ही ओपनिंगचा पर्याय म्हणून बघतोय. त्याचा बॅटिंग क्रमवारीमध्ये बदल करु नये असं आम्हाला वाटतंय, अशी प्रतिक्रिया रोहित शर्मानं दिली आहे. रोहितच्या या वक्तव्यामुळे अजिंक्य रहाणेला पुढच्या मॅचमध्येही स्थान मिळेल का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये अजिंक्य रहाणे खराब फॉर्ममध्ये होता.
"आम्ही बॅटिंगमध्ये चांगली कामगिरी केली नाही. जर आम्ही ७०-८० रन्स केले असते तर परिस्थिती काही वेगळी असती. या परिस्थितीत चांगलं प्रदर्शन करणं खूपच महत्वपूर्ण आहे. आजच्या या पराभमावमुळे आम्ही एक धडा शिकलो आहोत. तसेच आमचे डोळेही उघडले आहेत. आता आम्हाला पुन्हा चांगली कामगिरी करायची आहे" असं रोहित शर्माने म्हटलं आहे.
रोहित शर्माने पुढे म्हटलं की, "जर महेंद्रसिंग धोनीला आणखीन एका बॅट्समनने साथ दिली असती तर स्कोर आणखीन वाढला असता. ज्यावेळी आम्ही बॉलिंग करत होतो त्यावेळी पीचचा फायदा आम्हालाही झाला. मात्र, ११२ रन्स विजय मिळविण्यासाठी कमी होते.
विराट कोहलीच्या अनुपस्थित हा चांगला अनुभव नव्हता. आम्हाला कुठल्याच मॅचमध्ये पराभूत व्हायचं नाहीये. आता आगामी दोन मॅचेसमध्ये आम्हाला आमचं चांगलं प्रदर्शन दाखवायचं आहे असंही रोहितने म्हटलं.