दुबई : ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज डेव्हिड वॉर्नर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी विदेशी फलंदाज आहे. पण आयपीएल 2021च्या अंतिम सामन्यांमध्ये त्याला सनरायझर्स हैदराबादकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. अशा परिस्थितीत तो पुढीच्या सिझनमध्ये हैदराबाद संघासोबत खेळणार नाही अशी अटकळ होती.
यानंतर वॉर्नरने केलेल्या सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे तो हैदराबाद संघ सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. मात्र वॉर्नरने या गोष्टींवर स्पष्टीकरण दिलं आहे. तो म्हणाले, हैदराबाद हे त्याच्यासाठी दुसऱ्या घरासारखं आहे. त्याला तिथल्या चाहत्यांकडून खूप प्रेम मिळालं आहे.
स्पोर्ट्स टुडेशी बोलताना डेव्हिड वॉर्नर म्हणाला, "कधीकधी तुम्हाला असे संकेत मिळतात की तुम्हाला फ्रँचायझीकडून कायम ठेवण्यात येणार नाही. मला पुढच्या वर्षी हैदराबादचा भाग व्हायला आवडेल. हैदराबाद हे माझे दुसरं घर आहे."
वॉर्नर पुढे म्हणाला, "मला पुढच्या वर्षीही या टीमसाठी खेळायचं आहे. परंतु हे सर्व फ्रँचायझी आणि मॅनेजमेंटवर अवलंबून आहे. पुढील वर्षी मेगा लिलावही होणार आहे. मला कर्णधारपदावरून का काढून टाकलं हे मला माहित नाही. मात्र तरीही तरीही तुम्हाला पुढे जायचं आहे."
जेव्हा आयपीएलचा दुसरा टप्पा सुरू झाला, तेव्हापासून डेव्हिड वॉर्नरची फलंदाजी काही फारशी चांगली नव्हती. तो केवळ दोन सामने खेळला आणि त्यात 0, 2 असे रन्स केले. यानंतर सनरायझर्स हैदराबादने त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी दिली नाही. वॉर्नर बाहेर बसल्यावर चाहत्यांच्या वतीने नाराजी व्यक्त करण्यात आली. त्याच्या संघाच्या सामन्यांदरम्यान, वॉर्नर स्टँडमध्ये मात्र बसलेला दिसला.
डेव्हिड वॉर्नरचं नाव मॉडर्न टाइम ग्रेट प्लेयर्समध्ये घेतलं जातं. त्याने आयपीएलमध्येही सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. 2014 ते 2020 पर्यंत, डेव्हिड वॉर्नरने प्रत्येक हंगामात 500 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. फक्त 2021 च्या हंगामात, डेव्हिड वॉर्नर 8 सामन्यांत फक्त 195 रन्स करू शकला. अशा परिस्थितीत, हैदराबाद संघासाठी डेव्हिड वॉर्नरचा हा शेवटचा सिझन असल्याची चिन्हं बऱ्याच काळापासून होती.