नवी दिल्ली : कोरोना व्हायरस जगभरात चिंतेचं कारण बनलं आहे. जगभरात याने धुमाकूळ घातला आहे. कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढत चालला आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. देशात १०० हून अधिक जणांना याची लागण झाली आहे. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. देशातील अनेक राज्यांमधील शाळा आणि महाविद्यालय बंद करण्यात आले आहेत. अनेक सामने देखील रद्द करण्यात आले असून काही सामने पुढे ढकलण्यात आले आहेत.
भारताचा स्टार बुद्धीबळपटू आणि ५ वेळा विश्व चॅम्पियन ठरलेले विश्वनाथन आनंद यांना देखील याचा फटका बसला आहे. विश्वनाथन आनंद हे जर्मनीमध्य़े फसले आहेत. बुंदेसलिगामध्ये एका टूर्नामेंटमध्ये भाग घेण्यासाठी ते जर्मनीला गेले आहेत. सोमवारी त्यांना भारतात परत यायचं होतं. पण देशात सध्या बाहेरुन येण्यावर बंदी घालण्यात आल्याने त्यांना जर्मनीतच थांबावं लागलं आहे.
फेब्रुवारीमध्येच आनंद हे जर्मनीला गेले होते. पण आता एका आठवड्यासाठी आनंद हे येथेच राहणार आहेत. महिन्याच्या शेवटी ते चेन्नईला येतील असं म्हटलं जात आहे.