मुंबई : आयपीएलचा ११वा मोसम सध्या भारतात सुरु आहे. पण पुढच्या वर्षाच्या म्हणजेच १२व्या मोसमाबद्दल आत्ताच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. २०१९ साली होणारा वर्ल्ड हा ३० मे ते १४ जुलैपर्यंत खेळवण्यात येणार आहे. लोढा समितीच्या नियमांनुसार आयपीएल आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये १५ दिवसांचा कालावधी असणं बंधनकारक आहे. त्यामुळे आयपीएल २९ मार्च ते १९ मेपर्यंत खेळवलं जाईल. पण ही स्पर्धा देशाबाहेर खेळवली जाऊ शकते. २०१९ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमुळे पुढच्या वर्षी होणारं आयपीएल युएईमध्ये खेळवलं जाऊ शकतं. बीसीसीआयमधल्या एका अधिकाऱ्यानं ही माहिती दिली आहे.
२०१४ सालच्या निवडणुकीवेळीही आयपीएलचे पहिले दोन आठवडे युएईमध्ये खेळवण्यात आले होते. त्यावेळीही एप्रिल-मेमध्ये निवडणुका असल्यामुळे बीसीसीआयला हा निर्णय घ्यावा लागला होता. त्यामुळे यावेळीही असा निर्णय होऊ शकतो. हे सगळं लोकसभा निवडणुकांच्या तारखेवर अवलंबून आहे, असं या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.
निवडणूक आयोगानं निवडणुकांच्या तारखा घोषीत केल्यानंतर आम्ही याबाबत निर्णय घेऊ. त्यावेळच्या परिस्थिती आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर आयपीएल बाहेरच्या देशात खेळवायचं का नाही याबाबत निर्णय घेतला जाईल, असं बीसीसीआयनं सांगितलं आहे.
२००९ सालीही निवडणुकांमुळे संपूर्ण आयपीएल दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आलं होतं. पण टीम मालकांसाठी ही स्पर्धा फारशी फायदेशीर राहिली नव्हती.