मुंबई : सध्या टीम इंडियाचे (Team India) दोन संघ एकाच वेळेस 2 दौऱ्यावर आहेत. यापैकी विराट कोहलीच्या नेतृत्वातील मुख्य संघ हा इंग्लंड (England) दौऱ्यावर आहे. तर शिखर धवनच्या कॅप्टन्सीमध्ये युवा ब्रिगेड श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) भिडणार आहे. याआधी इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या गोटातून वाईट बातमी आली आहे. काही दिवसांपूर्वी युवा सलामीवीर शुबमन गिलला (Shubman Gill) सरावादरम्यान दुखापत झाली. त्यामुळे शुबमनला इंग्लंड विरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतून मुकावं लागल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान ही दुखापत मुंबईकर पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) पथ्यावर पडताना दिसतेय.
इंग्लंड विरुद्धच्या या टेस्ट सीरिजसाठी पृथ्वीला इंग्लंडला बोलावण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे पृथ्वीला इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळण्याची संधी मिळू शकते. पृथ्वी सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात उभयसंघ टी 20 आणि वनडे सीरिज खेळणार आहे. त्यामुळे पृथ्वीला इंग्लंडला बोलावलं जाण्याची तीव्र शक्यता आहे. टीओआयनुसार, इंग्लंड दौऱ्यावर असलेला भारतीय संघ याबाबतीत बीसीसीआयसह चर्चा करु शकते.
टीओआयला सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, "पृथ्वी सध्या शानदार फॉर्मात आहे. पृथ्वीला इंग्लंडला जावे लागू शकते. संघात सलामीवीर म्हणून केएल राहुलचा पर्याय आहे. पण केएलला मीडल ऑर्डरसाठी ठेवण्यात आले आहे. अभिमन्यू इश्वरनला या महत्वाच्या मालिकेत संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. एकूण 5 सामन्यांची मालिका आहे. त्यामुळे रोहित आणि मयंक दोघांपैकी 1-2 सामन्यांसाठी उपलब्ध नसले तर, संघाच्या अडचणीत वाढ होईल. त्यामुळे खबरदारी म्हणून पृथ्वीला इंग्लंडला बोलावण्याची शक्यता अधिक तीव्र आहे".
नक्की काय झालं?
शुबमनला सरावादरम्यान नक्की कोणत्या भागाला दुखापत झाली, याबाबतचा खुलासा करण्यात आलेला नाही. पण दुखापतीमुळे गिलला पुढील 6-8 आठवडे क्रिकेटपासून दूर रहावं लागणार असल्याचं म्हटलं जात आहे. यावरुन गिलला झालेली दुखापत ही गंभीर स्वरुपाची असल्याची चर्चा आहे.
मयंक आणि अभिमन्यु असताना पथ्वी का?
इंग्लंड दौऱ्यासाठी संघात मयंक आणि अभिमन्यू यांचा ओपनर म्हणून समावेश करण्यात आला आहे. मयंकने 2018 आणि 2019 ला कसोटीमध्ये ओपनर म्हणून धावांचा रतीब घातला आहे. तसेच पदार्पणाची वाट पाहत असलेल्या ईश्वरनकडे 64 प्रथम श्रेणी सामन्यांचा अनुभव आहे. पण हा इंग्लंड दौरा महत्वाचा आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पृथ्वीला इंग्लंडमध्ये बोलवलं जाऊ शकतं.
संबंधित बातम्या :
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी टीम इंडियाला झटका, दुखापतीमुळे स्टार खेळाडू बाहेर