T20 World Cup: टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीचा (Virat Kohli) फॉर्म चिंतेचा विषय होता. अंतिम सामन्याआधी विरोट कोहली संपूर्ण वर्ल्डकपमध्ये फक्त 75 धावा करु शकला होता. पण अखेरच्या सामन्यात विराट कोहलीची बॅट तळपली. दक्षिण आफ्रिकेविरोधातील सामन्यात विराट कोहलीने 76 धावा केल्या. विराट कोहलीने पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधताना आपल्या या खेळीबद्दल सांगितलं. अंतिम सामन्यासाठी आपण मैदानात उतरलो तेव्हा मला अजिबात आत्मविश्वास वाटत नव्हता अशी कबुली विराट कोहलीने दिली आहे. तसंच कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मला प्रेरित केलं असंही त्याने सांगितलं.
विराट कोहलीने यावेळी सांगितलं की, मी राहुल द्रविडला आपण स्पर्धेत चांगली कामगिरी करु शकत नसल्याचं सांगितलं होतं. तसंच अहंकारामुळे आपल्या खेळावर परिणाम झाल्याची कबुलीही त्याने दिली.
"मी जे काही प्रयत्न करत होतो त्याला यश येत नव्हतं. जेव्हा कधी तुम्हाला वाटतं की, 'मीच करु शकतो', तेव्हा तो फक्त अहंकार बोलत असतो. थोडक्यात जर तुमचा अहंकार आडवा येत असेल तर खेळ तुमच्यापासून दूर जातो. अनेकदा आपला अहंकार सोडणं फार महत्वाचं असतं. अंतिम सामन्यात तर अंहाकाराला काहीच जागा नव्हती. खासकरुन ज्याप्रकारे अंतिम सामन्या गोष्टी घडत होत्या ते पाहता अहंकाराला संधीच नव्हती. जेव्हा मी खेळाला आदर दिला तेव्हा संघाला त्याचा फायदा झाला. माझ्यासाठी हा मोठा धडा होता," असं विराट कोहली म्हणाला.
— gocvideo (@gocvideo) July 5, 2024
विराट कोहलीने यावेळी अंतिम सामन्यात आपण संघाच्या यशात योगदान देऊ शकलो याचा आनंद असल्याचं म्हटलं. "आम्ही प्रत्येक चेंडू जगलो. आमच्या मनात काय सुरु होतं हे मी शब्दांत सांगू शकत नाही. आम्ही एका क्षणी आशा सोडल्या होत्या. पण हार्दिकने विकेट घेतली आणि त्यानंतर प्रत्येक चेंडूसोबत आम्हाला ऊर्जा मिळत गेली. इतक्या मोठ्या सामन्यात संघ अडचणीत असताना मी योगदान देऊ शकलो याचा आनंद आहे. मी ते विसरु शकत नाही. मी संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात मदत करु शकलो याची आनंद आहे," असं विराट कोहली म्हणाला.
दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर विराट कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. विराट कोहलीसह रोहित शर्मानेही टी-20 मधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली.