कोलंबो : दहशतवादी हल्ल्याचा धोका असतानाही श्रीलंकेच्या पाकिस्तान दौऱ्याला हिरवा कंदिल देण्यात आला आहे. पाकिस्तान दौऱ्यामध्ये श्रीलंका ३ टी-२० आणि ३ वनडे मॅच खेळणार आहे. संरक्षण मंत्रालयाकडून परवानगी मिळाल्यामुळे टीम पाकिस्तान दौऱ्यावर जाणार असल्याचं श्रीलंका क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलं आहे. तसंच श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे पदाधिकारीही पाकिस्तानमध्ये जाणार आहेत. पाकिस्तान सरकारने श्रीलंकेच्या टीमला चोख सुरक्षा द्यायचं आश्वासन दिल्याचं श्रीलंका बोर्डने त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात सांगितलं आहे.
पाकिस्तान दौऱ्यात श्रीलंकेच्या टीमवर हल्ला होऊ शकतो, असा इशारा श्रीलंका क्रिकेट बोर्डाला मिळाला होता. यानंतर श्रीलंकेच्या पंतप्रधान कार्यालयाने या दौऱ्याचा पुनर्विचार करा, असा सल्ला दिला. या सल्ल्यानंतर श्रीलंका सरकारने पुन्हा एकदा पाकिस्तानमधल्या सुरक्षेची पाहणी केली.
२७ सप्टेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. २७ सप्टेंबरला पहिली वनडे, २९ सप्टेंबरला दुसरी आणि २ ऑक्टोबरला तिसरी वनडे खेळवण्यात येईल. यानंतर ५, ७ आणि ९ ऑक्टोबरला टी-२० मॅच होतील. तीन वनडे कराचीमध्ये तर टी-२० मॅच लाहोरच्या गडाफी स्टेडियममध्ये होतील.
२००९ साली पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या श्रीलंकेच्या टीमवर जीवघेणा दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. दहशतवाद्यांनी श्रीलंका टीमच्या बसवर गोळीबार केला होता. यात ६ खेळाडू जखमी झाले होते.
श्रीलंकेच्या १० प्रमुख खेळाडूंनी या दौऱ्यातून सुरक्षेच्या कारणामुळे माघार घेतली आहे. दिमुथ करुणारत्ने, लसिथ मलिंगा, एंजलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, कुसल परेरा, धनंजय डिसिल्वा, थिसारा परेरा, अकिला धनंजया, सुरंगा लकमल, दिनेश चंडीमल यांनी पाकिस्तानमध्ये जायला नकार दिला.
२००९ साली श्रीलंकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा दौरा करण्यासाठी कोणतीच टीम तयार नव्हती. २०१५ साली झिम्बाब्वेने पाकिस्तानचा दौरा केला होता. तर २०१७ साली श्रीलंकेने पाकिस्तानमध्ये १ टी-२० मॅच खेळली होती. २०१८ साली वेस्ट इंडिजने पाकिस्तानमध्ये ३ टी-२० मॅचची सीरिज खेळली होती.
लाहिरु थिरमान(कर्णधार), दानुष्का गुणतिलका, सदीरा समरविक्रमा, आविष्का फर्नांडो, ओशादा फर्नांडो, शेहान जयसूर्या, मिनोद बनुका, एंजलो परेरा, वानिंदु हसरंगा, लक्षण संदाकन, नुवान प्रदीप, इसरु उडाना, कसुन रजीता, लाहिरु कुमारा
दासुन शनाका (कर्णधार), दानुष्का गुणतिलका, सदीरा समरविक्रमा, आविष्का फर्नांडो, ओशादा फर्नांडो, शेहान जयसूर्या, एंजलो परेरा, भानुका राजपक्षे, मिनोद बनुका, लाहिरु मदुशंका, वानिंदु हसरंगा, लक्षण संदाकन, नुवान प्रदीप, इसरु उडाना, कसुन रजीता, लाहिरु कुमारा