मुंबई : आयपीएलच्या ११व्या हंगामात मुंबईची हाराकिरी सुरुच आहे. मुंबईला मंगळवारी हैदराबादकडून पराभवाचा सामना करावा लागला. विजयासाठी कमी धावांचे लक्ष्य असतानाही मुंबईला हे आव्हान पूर्ण करता आले नाही. मुंबईला केवळ विजयासाठी ११९ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. मात्र मुंबईचा संपूर्ण डाव ८७ धावांवर आटोपला.
यासोबतच हैदराबादने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आपले विजयाचे खाते खोलले. या पराभवामुळे मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा चांगलाच निराश झालाय. त्याने या पराभवाचे खापर मुंबईच्या फलंदाजांवर फोडलेय.
सामना संपल्यानंतर रोहित म्हणाला, आम्ही या पराभवासाठी स्वत:ला दोषी ठरवू. आम्हाला ११८ धावांचे लक्ष्य गाठायचे होते. मात्र हैदराबादच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. आमच्या फलंदाजांनी पुन्हा वाईट कामगिरी केली. गोलंदाजांनी लवकरात लवकर सुधारणा करणे गरजेचे आहे. आम्हाला सुरुवातीपासून सामन्यावर पकड ठेवायची होती.
यंदाच्या आयपीएलमधल्या ६ मॅचमध्ये मुंबईचा हा पाचवा पराभव आहे. त्यामुळे प्ले ऑफमध्ये क्वालिफाय करण्यासाठी मुंबईचा रस्ता आणखी खडतर झाला आहे. ११९ रनचा पाठलाग करताना मुंबईला लागोपाठ धक्के बसत होते.