Video: 31 वर्षीय खेळाडू RCB चा नवा कर्णधार; विराटची पहिली प्रतिक्रिया! म्हणाला, 'मी आणि...'

Virat Kohli First Comment On RCB New Captain: विराट कोहलीनेही अनेक वर्ष संघाचं नेतृत्व केलं आहे. आता पुन्हा त्याच्याकडे जबाबदारी सोपवली जाईल अशी चर्चा होती. मात्र तसं घडलं नाही.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 13, 2025, 01:18 PM IST
Video: 31 वर्षीय खेळाडू RCB चा नवा कर्णधार; विराटची पहिली प्रतिक्रिया! म्हणाला, 'मी आणि...' title=
नवीन कर्णधाराच्या निवडीनंतर विराटची प्रतिक्रिया

Virat Kohli First Comment On RCB New Captain: इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलचं 2025 चं पर्व पुढील काही आठवड्यांमध्ये सुरु होणार आहे. त्यापूर्वी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या.  अनेक संघांनी आपल्यासाठी विक्रमी बोली लावत कर्णधार म्हणून नेतृत्व करण्याच्या दृष्टीने खेळाडूंना संघात स्थान दिलं. मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने कर्णधार फॅफ ड्युप्लेसीसला आरसीबी व्यवस्थापनाने करारमुक्त केल्यानंतर मेगा ऑक्शनमध्ये कोणत्याही मोठ्या खेळाडूवर बोली लावली नाही. त्यामुळे संघातील खेळाडूच कर्णधार होणार हे निश्चित होतं. असं असतानाच आज संघाने नव्या कर्णधाराची घोषणा केली. माजी कर्णधार विराट कोहलीवरच पुन्हा जबाबदारी सोपवली जाईल अशी चर्चा असतानाच एका 31 वर्षीय खेळाडूच्या खांद्यावर सोपवली आहे. या अगदीच अनपेक्षित निवडीनंतर विराटने पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

नवा कर्णधार कोण?

विराट कोहलीने 2013 ते 2021 दरम्यान आरसीबीचं नेतृत्व केलं आहे.  विराटच्या नेतृत्वाखाली आरसीबीचा संघ 2016 च्या पर्वात अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. मात्र हा सामना आणि चषक सनरायझर्स हैदराबादच्या संघाने जिंकला होता. विराटनंतर कर्णधार झालेल्या फॅफ ड्युप्लेसीसलाही संघाचं नशीब पालटता आलं नाही. आता पुन्हा विराटकेच नेतृत्व जाईल असं वाटत असतानाच संघाने कर्णधारपद 31 वर्षीय रजत पाटीदारकडे सोपवलं आहे. या निर्णयानंतर विराटने आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवताना नव्या कर्णधाराला एक शब्द दिला आहे.

विराट नव्या कर्णधाराच्या नियुक्तीवर काय म्हणाला?

विराटने पाटीदार कर्णधार झाल्यानंतर त्याला शुभेच्छा दिल्या. "सर्वात आधी मला तुझं अभिनंदन करायचं आहे. ऑल द बेस्ट! तू खरोखरच सर्व आरसीबी चाहत्यांच्या हृदयामध्ये मागील काही वर्षांमध्ये विशेष स्थान मिळवलं आहे. तू या पदासाठी पात्र आहेस," असं 36 वर्षीय विराट या घोषणेनंतरच्या विशेष संदेशामध्ये म्हणाला. "मी आणि आरसीबी संघातील इतर सदस्य कायमच तुला पाठिंबा देण्यासाठी तयार असू," असा शब्दही विराटने नव्या कर्णधाराला दिला. "हा तुझा फार मोठा सन्मान आहे. मला तुझ्या या यशाबद्दल फार समाधान वाटत असून आनंद झाला आहे," असंही विराटने म्हटलं आहे. आरसीबीच्या चाहत्यांनीही रजतला पाठिंबा द्यावा असं आवाहन विराटने केलं आहे.

आठ कर्णधार पण एकही जेतेपद नाही

आरसीबीने 2009, 2011 आणि 2016 साली आयपीएलची फायनल खेळली आहे. मात्र एकदाही आरसीबीला जेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही. रजतपूर्वी राहुल द्रविड, डॅनिअल व्हिक्टोरी, शेन वॉट्सन, विराट कोहली, फॅफ ड्युप्लेसीस, शेन वॉट्सन आणि अनिल कुंबळे या सात खेळाडूंनी आतापर्यंत आरसीबीचं कर्णधारपद भूषवलं आहे.