IND vs ENG Test Series : टीम इंडियाने रविवारी राजकोट येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा ४३४ धावांच्या मोठ्या फरकाने ऐतिहासिक विजय मिळवला आणि यासोबतच सिरीजमध्ये २-१ ची आघाडी घेतली आहे. हा भारताचा धावसंख्येच्या हिशोबाने सर्वात मोठा विजय ठरला. या सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याने धुंवाधार द्विशतक ठोकलं. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर दुसऱ्या डावात टीम इंडियाला साडेपाचशे धावा पूर्ण करता आल्या. त्यामुळे सध्या यशस्वीचं क्रिडाविश्वात कौतूक होताना दिसत आहे. अशातच टीम इंडियाचे माजी हेडकोच रवी शास्त्री (Ravi shastri) यांनी यशस्वीचं तोंडभरून कौतूक केलंय.
भारताचे माजी कोच रवी शास्त्री यांनी राजकोट टेस्टमध्ये इंग्लंडविरूद्ध उत्कृष्ट प्रदर्शन केलेल्या युवा भारतीय फलंदाज यशस्वी जयस्वाल याची प्रशंसा केली. पहिल्या डावात अपयशी ठरलेला यशस्वीने मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये आपली फलंदाजीची कमाल दाखवली. तिसऱ्या दिवशी यशस्वी हा १०४ धावांवर दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट झाला होता, पण चौथ्या दिवशी तो मैदानावर फलंदाजी करण्यासाठी पुन्हा आला आणि ताबडतोब दुहेरी शतक ठोकलं आणि २१४ धावांवर नाबाद राहिला. यशस्वीच्या या इनिंगची तुलना रवी शास्त्री यांनी महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्याशी केली आहे.
काय म्हणाले रवी शास्त्री?
रवी शास्त्री म्हणतात.., यशस्वी जयस्वालच्या फलंदाजीचे प्रदर्शन बघून मी खुप खुश झालो. तो फक्त बॅटने नाही तर त्याच्या बॉलिंग आणि फिल्डिंग च्या कौशल्याने सुध्दा साऱ्यांना प्रभावित करतोय. पुढे शास्त्री म्हणाले की, मला वाटतं पुढे जाऊन रोहितसाठी यशस्वी हा पार्ट टाइम बॉलिंग सुद्धा करू शकतो. 'जर तुम्ही स्वत:वर विश्वास करणार, तर अपेक्षा कायम असतात. काहीही असंभव नसतं', या म्हणीचं उदाहरण म्हणजे यशस्वी जयस्वाल... हे तर फक्त शब्द आहेत, पण तुम्ही त्याला सतत टिममध्ये बघणार, असा विश्वास रवी शास्त्री यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, भारत विरूद्ध इंग्लंडच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात, भारताने ४३४ धावांनी इंग्लंडला मात दिली आणि सिरीज मध्ये २-१ ची आघाडी घेतली. ५५७ धावांचा पाठलाग करत इंग्लंडचा संघ फक्त १२२ धावात गारद झाला. धावांच्या हिशोबाने भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. या आधी २०२१ मध्ये भारताने न्यूझीलंडला मुंबई येथे वानखेडे स्डेडियममध्ये ३७२ धावांनी पराभूत केलं होतं. तर ओव्हरऑल हा भारताचा आठवा सर्वात मोठा विजय आहे. तर याउलट इंग्लंडची ही दुसरी सर्वात मोठी हार आहे.