रॅम्पवॉक केल्याने ट्रोल करणाऱ्यांना मनू भाकरने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली 'तुमचं आयुष्य...'

ऑलिम्पिक पदक विजेता मनू भाकरने (Manu Bhaker) नुकतंच Lakme Fashion Week 2024 मध्ये रॅम्पवॉक केला. एकीकडे तिने रॅम्पवॉक केल्याने कौतुक होत असताना, काहीजण टीका करत आहेत.   

शिवराज यादव | Updated: Oct 15, 2024, 06:07 PM IST
रॅम्पवॉक केल्याने ट्रोल करणाऱ्यांना मनू भाकरने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली 'तुमचं आयुष्य...' title=

ऑलिम्पिक पदक विजेता मनू भाकरने (Manu Bhaker) नुकतंच Lakme Fashion Week 2024 च्या निमित्ताने रॅम्पवर पदार्पण केलं. ती रॅम्पवर ज्या आत्मविश्वासने वावरली त्याचं कौतुक होत आहे. तिने रॅम्पवॉक केल्यानंतर काही वेळातच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सोशल मीडियावर अनेकांनी तिचं कौतुक केलं. पण यातील काहीजणांनी तिच्यावर टीकाही केली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदक जिंकणाऱ्या मनू भाकरने सांगितल्यानुसार, काहींनी तिच्या रॅम्पवॉकवर नकारात्मक कमेंट्स केल्या. मनु भाकर लवकरच आपल्या ट्रेनिंगला सुरुवात करणार आहे. 

"तुमच्या चांगल्या शब्दांसाठी मी तुमची आभारी आहे. काही द्वेष करणारेही मला दिसत आहेत. मला फक्त इतकंच सांगायचं आहे की, स्वत:ला मर्यादित ठेवू नका, तुमचं आयुष्य मोठं, तुमचं करिअर उज्ज्वल आणि पालकांना अभिमान वाटेल असं करा. द्वेष करणारे द्वेष करतील आणि प्रेम करणारे प्रेम करतील. तुमचे मनोबल उंच ठेवा आणि स्वतःचा मार्ग स्वतःच्या शैलीने तयार कराल. कोणताही शॉर्टकट नसतो, परंतु जेव्हा चांगल्या गोष्टींमुळे तुम्हाला कठीण काम करण्याची ताकद मिळते तेव्हा सोप्या गोष्टी कशाला करायचा, चिअर्स," असं मनु भाकरने तिच्या इंस्टाग्राम पोस्टच्या कमेंटमध्ये लिहिलं आहे. या पोस्टमध्ये तिने रॅम्पवॉकमधील क्षण शेअर केले आहेत. 

मनू भाकरने सांगितलं की, ती नोव्हेंबरमध्ये पुन्हा प्रशिक्षण सुरू करणार असून पुढील वर्षी स्पर्धात्मक शूटिंगमध्ये परतणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू भाकर मंगळवारपासून राजधानीत सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशन (ISSF) विश्वचषक फायनलच्या आधी दिल्लीत माध्यमांशी बोलत होती. प्रसारमाध्यमांशी बोलताना भाकर म्हणाली, "मी नोव्हेंबरमध्ये सरावासाठी आणि पुढच्या वर्षी सामन्यासाठी परतेन. माझी नजर 10 मीटर, 25 मीटर स्पर्धेवर असेल.

ऑलिम्पिकनंतर मी घेतलेली विश्रांती याबाबत आधीच निर्णय झाला होता असंही मनु भाकरने सांगितलं. मी आणि माझे प्रशिक्षक जसपाल राणा यांनी याबाबत निर्णय घेतला होता असं ती म्हणाली. "मला स्पर्धा खेळावं असं वाटत आहे. पण ऑलिम्पिकच्या आधी माझ्या प्रशिक्षकांनी मला मी अनेक दुखापतींचा सामना करत असल्याने तीन महिन्यांची विश्रांती घेण्यास सांगितलं होतं," असं ती म्हणाली.

भाकरने आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवता आल्याने आनंद व्यक्त केला आहे. "बऱ्याच दिवसांनी मला माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे. मी घरी बनवलेले पदार्थ खाते आणि त्याचा खूप आनंद घेतो," असं ती पुढे म्हणाली. 

विश्वचषक फायनलमध्ये भाग घेण्याबाबत बोलताना भाकर म्हणाली की तरुणांसाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे. कारण या स्पर्धेत फक्त "चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन" भाग घेतात. ती पुढे म्हणाली, "येथे खेळणे हा एक मोठा अनुभव आहे. खेळाडूंना यातून जास्तीत जास्त फायदा करून घेतला पाहिजे, आपले सर्वोत्तम द्यायला हवे आणि घाबरू नये," असंही ती पुढे म्हणाली.