सहा तासांहून अधिक काळ चाललेल्या एका रोमांचक डावात नवोदित जागतिक बुद्धिबळ चॅम्पिअन गुकेश डोम्मराजू त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी जीएम नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह विरुद्ध सहाव्या फेरीत ड्रॉ करण्यात यशस्वी झाला. नेदरलँड्समधील विज्क आन झी येथे झालेल्या टाटा स्टील बुद्धिबळ मास्टर्स 2025 मध्ये दोघे आमने-सामने आले होते. अब्दुसत्तोरोव्हचे खेळात वर्चस्व असूनही, गुकेशने अपवादात्मक लवचिकता दाखवून परतीचा मार्ग पक्का केला आणि अर्धा गुण मिळवला. कठीण परिस्थितीतही सामन्यात टिकून राहत त्याने स्वत:ला सिद्ध केलं.
या बहुप्रतिक्षित सामन्यात संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या अब्दुसत्तोरोव्हने सुरुवातीपासून आक्रमक खेळी करून फायदा मिळवला. एका टप्प्यावर, समालोचन करताना माजी विश्वविजेता मॅग्नस कार्लसनने गुकेशच्या रणनीतीवर टीका केली आणि त्याला "अद्भुत अपयश" म्हटले. कार्लसन म्हणाला, "गुकेशची रणनीती एक अद्भूत अपयश आहे."
तथापि, कार्लसनने अब्दुसत्तोरोव्हच्या अचूकतेचे कौतुक केले. "त्याला संधी मिळताच तो निर्दयी होतो. तो अचूक गणना करतो, त्याला गती जाणवते आणि मानसिकदृष्ट्या तो तिथेच असतो. ते खूप, खूप प्रभावी आहे!" आठ वेळा विक्रमी विजेतेपद जिंकणारा नॉर्वेजियन खेळाडू कार्लसन म्हणाला आहे.
2022 च्या चेन्नई ऑलिंपियाडपासून सुरू असलेल्या या दोन तरुण ग्रँडमास्टरमधील स्पर्धेमुळे खेळाची तीव्रता वाढली. त्या स्पर्धेत, अब्दुसत्तोरोव्हकडून गुकेशचा पराभव झाल्याने भारताच्या सुवर्णपदकाच्या आशा धुळीस मिळाल्या होत्या आणि त्याऐवजी उझबेकिस्तान संघाने अव्वल स्थान पटकावले होते. या इतिहासामुळे त्यांच्या खेळाकडे सर्वांचं लक्ष होतं.
गुकेशने ज्याने अलिकडेच आपल्याच देशाच्या अर्जुन एरिगियासीला मागे टाकून नवीनतम FIDE रँकिंगमध्ये चौथ्या क्रमांकाचा भारतीय बुद्धिबळपटू बनला आहे. बहुतेक सामन्यात दबावाखाली असतानाही तो बचाव करण्यात आणि सामना जिवंत ठेवण्यात यशस्वी ठरला. खेळानंतरच्या त्याच्या कामगिरीचा विचार करताना, गुकेशने सुरुवातीलाच त्याच्या संघर्षांची कबुली दिली. "संपूर्ण सामन्यात माझ्यावर दबाव होता, मला वाटतं की मी सुरुवातीमध्ये चुकीची खेळी केली. मी खूप चांगला बचाव केला. मला खात्री आहे की त्याच्याकडे काही संधी होत्या पण खेळात टिकून राहण्यासाठी नेहमीच काही युक्त्या शोधाव्या लागतात," असं तो म्हणाला. स्पर्धेत दुसऱ्यांदा गुकेश पराभूत स्थितीतून बरोबरी साधण्यात यशस्वी झाला आहे, यापूर्वी त्याने पहिल्या फेरीत अनिश गिरीविरुद्धचा कठीण सामना फिरवला होता.
आपल्या प्रतिस्पर्ध्याबद्दल बोलताना, गुकेशने अब्दुसत्तोरोव्हच्या खेळण्याच्या शैलीबद्दल आदर व्यक्त केला. "तो सध्या जगातील सर्वात आशादायक खेळाडूंपैकी एक आहे. मला तो कसा खेळतो हे खूप आवडते. तो नेहमीच लढण्याचा प्रयत्न करतो आणि अशा प्रकारच्या खेळाडूंविरुद्ध खेळणे नेहमीच रोमांचक असते," असं कौतुक त्याने केलं.