मुंबई : वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले आहेत. यामध्ये फिल्डिंग प्रशिक्षक होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्स यांनीही अर्ज पाठवला आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. क्रिकेट खेळलेला जगातील सर्वोत्कृष्ट फिल्डर अशी जॉन्टी ऱ्होड्सची ओळख आहे.
'जॉन्टी ऱ्होड्सने याआधी कोणत्याही राष्ट्रीय टीम सोबत काम केलेलं नाही. पण त्याने सलगपणे आयपीएलमध्ये मुंबईचे फिल्डिंग कोच म्हणून काम पाहिलं आहे.' असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं.
प्रशिक्षकपदासाठीच्या अटीनुसार राष्ट्रीय टीमसोबत काम केल्याचा अनुभव नसल्यास किमान आयपीएलमध्ये ३ वर्षांचा प्रशिक्षकपदाचा अनुभव असण्याची अट घालण्यात आली आहे.
आयपीएलमध्ये मुंबईचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिल्याने ऱ्होड्सला भारतीय खेळांडूची उणीव जवळून माहिती आहे. आर. श्रीधर हे सध्या टीम इंडियाचे फिल्डिंग प्रशिक्षक आहेत. आर श्रीधर यांचा वर्ल्ड कपनंतर कार्यकाळ संपला होता, पण तो कार्यकाळ ४५ दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे.
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीने भारतीय टीमकडून किंवा आयपीएल स्पर्धेत किमान तीन वर्ष खेळलं पाहिजे. याखेरीज त्या माजी खेळाडूला ३० टेस्ट किंवा ५० वनडे मॅचचा अनुभव पाहिजे. अर्ज करणाऱ्या व्यक्तीचं वय हे ६० वर्षांपेक्षा कमी असलं पाहिजे आणि किमान दोन वर्षांचा आंतरराष्ट्रीय अनुभव त्याच्याकडे असला पाहिजे. प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याची अखेरची मुदत ही ३० जुलै आहे.