हैदराबाद : २०१९ सालच्या आयपीएलमध्ये मुंबईचा विजय झाला. अत्यंत रोमहर्षक अशा फायनलमध्ये मुंबईने चेन्नईचा शेवटच्या बॉलवर १ रनने पराभव केला. आयपीएलच्या फायनलमध्ये टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या मुंबईने २० ओव्हरमध्ये ८ विकेट गमावून १४९ रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना वॉटसनने ८० रनची खेळी करून चेन्नईला विजयाच्या जवळ नेलं, पण मलिंगाने शेवटच्या बॉलवर शार्दुल ठाकूरची विकेट घेऊन मुंबईला चौथी आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली.
यंदाच्या मोसमात मुंबईने खेळलेल्या १६ मॅचपैकी ११ मॅचमध्ये विजय मिळवला. पॉईंट्स टेबलमध्येही मुंबईची टीम पहिल्या क्रमांकावर राहिली. या मोसमात मुंबईचा शेवटचा पराभव झाला तो कोलकात्याविरुद्ध. ईडन गार्डनच्या मैदानात झालेल्या या मॅचमध्ये रसेलच्या वादळी खेळीनंतर मुंबईचा ३४ रनने पराभव झाला. कोलकात्याने ठेवलेल्या २३३ रनचा पाठलाग करताना मुंबईला २० ओव्हरमध्ये १९८/७ एवढा स्कोअर करता आला. हार्दिक पांड्याने या मॅचमध्ये ३४ बॉलमध्ये ९१ रनची खेळी केली. याच मॅचमध्ये हार्दिकने यंदाच्या मोसमातलं सगळ्यात जलद अर्धशतक झळकावलं. हार्दिक पांड्याने १७ बॉलमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं.
कोलकात्याविरुद्ध झालेल्या या पराभवानंतर मुंबई टीमच्या मालक नीता अंबानी यांनी टीमच्या सगळ्या सदस्यांसमोर एक प्रेरणादायी भाषण केलं. यानंतर मुंबईची कामगिरी पूर्णपणे पालटली. मुंबई टीमने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडओ टाकला आहे.
'आता आपण सगळे एकत्र येऊन टीम हडल करून आपला एकमेकांवर विश्वास आहे, असं म्हणणार आहोत. एकमेकांवर विश्वास दाखवणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मागच्या काही वर्षांमध्ये मुंबईच्या टीमने अशक्य अशा गोष्टीही करून दाखवल्या आहेत. लागोपाठ ५ मॅचमध्ये पराभव पत्करूनही आपण आयपीएल जिंकली होती. माझा तुमच्या सगळ्यांवर विश्वास आहे, या टीममधला प्रत्येक जण मॅच विनर आहे. तुम्ही स्वत:वर आणि तुमच्या सहकाऱ्यावर विश्वास ठेवा, एवढंच माझं म्हणणं आहे. त्यांच्यासाठी चिअर करा. आपण एकत्र येऊन हडल करू आणि आमचा एकमेकांवर विश्वास आहे, तसंच मुंबईच्या टीमसाठी काहीही अशक्य नसल्याचं म्हणू', असं नीता अंबानी म्हणाल्या.
नीता अंबानीच्या या कानमंत्रानंतर मुंबईची कामगिरी पूर्णपणे बदलून गेली. कोलकात्याविरुद्ध झालेल्या पराभवानंतर हैदराबादविरुद्धचा सामना मुंबईने सुपर ओव्हरमध्ये जिंकला. मग वानखेडे स्टेडियमवर पुन्हा कोलकात्याविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये मुंबईचा तब्बल ९ विकेटने दणदणीत विजय झाला. यानंतर क्वालिफायर-१ मॅचमध्ये मुंबईने चेन्नईला ६ विकेटने हरवलं आणि फायनलमध्ये पुन्हा एकदा मुंबईने चेन्नईचा १ रनने पराभव करत आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.