नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये भारताचा ३-२ ने पराभव झाला. मुख्य म्हणजे पहिल्या दोन्ही मॅच जिंकल्यानंतर भारताने उरलेल्या तिन्ही मॅचमध्ये हार पत्करली. २०१५ नंतर भारताने मायदेशात पहिल्यांदाच वनडे सीरिज गमावली आहे. पण ही सीरिज गमावल्याची आम्हाला खंत किंवा निराशा नाही, असं वक्तव्य विराट कोहलीने केलं आहे.
कोहली म्हणाला, 'आम्ही या सीरिज पराभवामुळे खचलेलो नाही. तसेच आम्हाला या पराभवाबद्दल कोणत्याच प्रकारची खंत नाही. पण आगामी वर्ल्ड कपमध्ये जर चांगली कामगिरी करायची असेल तर, योग्य निर्णय घ्यायला हवेत. वर्ल्ड कपसाठी खेळाडू आणि टीम पूर्णपणे तयार आहे. पण कोणता खेळाडू कोणत्या क्रमांकावर खेळणार याबद्दल खलबतं सुरु आहेत.
'प्रामाणिकपणे सांगतो की, टीममधील कोणताही खेळाडू पराभवामुळे निराशेच्या गर्तेत नाही किंवा या पराभवामुळे कोणताही खेळाडूला या बदद्ल खंत नाही. वर्ल्ड कपच्या तोंडावर भारतीय टीम प्रशासनाकडून अनेक खेळाडूंची कामगिरी पाहण्यासाठी त्यांना टीममध्ये स्थान देण्यात आले होते. त्यासाठी अनेक वेगवेगळे प्रयोग केले गेले. या प्रयोगांना आम्ही पराभवाचे कारण म्हणून पुढे करु शकत नाही. वर्ल्ड कपसाठी एका स्थानासाठी आमच्यात चर्चा सुरु आहे. त्याशिवाय अन्य क्रमांकावर कोणता खेळाडू खेळणार हे ठरलेलं आहे.' अशी प्रतिक्रिया कोहलीने दिली.
'आम्ही घेतलेल्या काही निर्णयांपैकी काही निर्णय हे चुकीचे ठरले. त्या चुकलेल्या निर्णयांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील. वर्ल्ड कपमधील आमची भू्मिका ठरलेली आहे. आमचे लक्ष आता योग्य निर्णय घेण्यावर आहे. आमची टीम पूर्णपणे सज्ज आहे. आम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरवण्यावर आमचे लक्ष असणार आहे, असं कोहलीने नमूद केलं.
ऑस्ट्रेलियाने १० वर्षांनंतर भारतात वनडे सीरिज जिंकली आहे. याआधी ऑस्ट्रेलियाने भारतात २००९ ला सीरिज जिंकली होती. कोहलीने ऑस्ट्रेलियाचे विजयी झाल्याबदद्ल अभिनंदन केले. 'आम्ही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना ज्या उत्साहाने खेळलो होतो, त्याच उत्साहाने ऑस्ट्रेलया या सीरिजमध्ये खेळली. त्यांच्यामध्ये सकारात्मक उर्जा पाहायाला मिळाली. त्यांना मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं केलं. सीरिजमधील पहिल्या दोन मॅच गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने चांगले पुनरागमन करत सीरिज जिंकली. भारताविरोधात भारतातच सीरिज जिंकल्याने ऑस्ट्रेलियाचा विश्वास दुणावला असेल', असं कोहली म्हणाला.