मुंबई : कॅप्टन पृथ्वी शॉच्या ५७ रन्स आणि अनुकूल रॉयनं घेतलेल्या ५ विकेट्समुळे अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतानं पपुआ न्यूगिनीचा १० विकेट्सनं पराभव केलाय. यंदाच्या वर्ल्ड कपच्या दोन मॅचमधला भारताचा हा दुसरा विजय आहे. या मॅचमध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले पपुआ न्यूगिनीला बॅटिंगला बोलावलं. पपुआ न्यूगिनी ६४ रन्सवर ऑल आऊट झाली.
भारताचा कॅप्टन पृथ्वी शॉनं ३९ बॉल्समध्ये १२ फोरच्या मदतीनं नाबाद ५७ रन्स केल्या तर मनजोत कालरा ९ रन्सवर नाबाद राहिला. या मॅचमध्ये अनुकूल रॉयला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. अनुकूल रॉयनं या मॅचमध्ये शानदार बॉलिंग करत पाच विकेट घेतल्या.
पपुआ न्यूगिनीचा ओविया साम १५ आणि सिमोन अटाईनं १३ रन्स केल्या. ओविया आणि अटाईशिवाय कोणत्याच बॅट्समनला दोन आकडी धावसंख्या करता आली नाही. पपुआ न्यूगिनीचे चार बॅट्समन शून्य रनवर आऊट झाले.
अनुकूल रॉयशिवाय भारताच्या शिवम मावीनं २ विकेट, कमलेश नागरकोटी आणि अर्शदीप सिंगनं एक-एक विकेट घेतली. लक्ष्याचा पाठलाग करायला आलेल्या भारताच्या पृथ्वी शॉ आणि मनजोत कालरानं ६७ रन्सची पार्टनरशीप करून भारताला १० विकेट्सनं जिंकवलं.
दोन मॅचमध्ये दोन विजयासह भारताकडे आता चार पॉईंट्स आहेत. भारताचा पुढचा सामना १९ जानेवारीला झिम्बाब्वेविरुद्ध आहे. या विजयाबरोबरच भारत क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला आहे.