Team India Record in World Cup Knockout Matches: आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेत लीग सामने संपले आहेत आणि 15 नोव्हेंबरपासून सेमीफायनलची (World Cup Semifinal) चुरस सुरु होईल. भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडदरम्यान विश्वचषकासाठी लझत रंगेल. सेमीफायनलमध्ये भारताचा सामना न्यूझीलंडशी (India vs New Zealand) होणार आहे. 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. 2011 नंतर भारतीय क्रिकेट संघाला सलग दोनदा नॉकआऊट (Knockout Matches) सामन्यात पराभाव पत्करावा लागला आहे.
1975 ते 1983 विश्वचषक
1975 मध्ये पहिला एकदिवसीय विश्वचषक खेळवण्यात आला. या स्पर्धेत भारतीय संघ नॉकआऊट सामन्यापर्यंत पोहोचू शकला नाही. 1979 विश्वचषक स्पर्धेतही भारताला लीगमध्येच गाशा गुंडाळावा लागला. पण 1983 विश्वचषक स्पर्धेत भारताने दिग्गज संघांना पराभवाचा धक्का देत थेट पहिल्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. दिग्गज खेळाडू कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये बलाढ्य इंग्लंडचा पराभव केला. तर अंतिम सामन्यात दोनवेळच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडिजला धुळ चारत विश्वचषकावर नाव कोरलं.
1987 ते 1996 विश्वचषक
1983 मध्ये विश्वचषक पटकावल्यानंतर 1987 विश्वचक स्पर्धेत टीम इंडिआने सेमीफायनलपर्यंत धडक मारली. पण मुंबईच्या वानखेडे मैदानावर इंग्लंडने भारताचा पराभव करत स्पर्धेतून बाहेर केलं. 1992 मध्ये टीम इंडिया राऊंड रॉबिनमध्येच बाहेर पडली. तर 1996 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. पण पुन्हा एकदा नॉकआऊट सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. सेमीफायनलमध्ये श्रीलंकेने 252 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. विजयाचं आव्हान समोर ठेऊन खेळणाऱ्या भारताची अवस्था 120 धावात 8 विकेट अशी झाली होती. भारताच्या या खराब कामगिरीवर कोलकात्याच्या ईडन गार्डनवरील प्रेक्षक संतापले आणि स्टेडिअममध्ये जाळपोळ केली. त्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला आणि श्रीलंकेला विजयी घोषित करण्यात आलं. 1999 मध्ये टीम इंडियाला सुपर सिक्समध्ये पराभव पत्करावा लागला.
2003 ते 2011 विश्वचषक
2003 विश्वचषकात सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघआने सेमीफायनलमध्ये केनियाचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. पम ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्विकारावा लागला. 2007 चा विश्वचषक राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियासाठी वाईट स्वप्न होतं. खिताव जिंकणाऱ्या संघांच्या यादीत असणाऱ्या भारतीय संघाला ग्रुप स्टेजमध्येच लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. पण ही कसर भारतीय संघाने 2011 मध्ये पूर्ण केली. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगलेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला आणि दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. महेंद्रसिंग धोनीच्या विजयी षटकाराची इतिहासात नोंद झाली.
2015 ते 2019 विश्वचषक
2011 चा फॉर्म काय राखत टीम इंडियाने 2015 मध्येही दमदार कामगिरी केली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. पण ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा भारताचं स्वप्न धुळीस मिळवलं. टीम इंडियाला 95 धावांन पराभव स्विकारावा लागला. 2019 विश्वचषकात टीम इंडियाने पुन्हा एकदा विजयाचा हुंकार भरला. रोहित शर्माने इतिहास रचत 5 शतकं केली. पण सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा 18 धावांनी पराभव केल आणि भारताला पुन्हा एकदा नॉकआऊट सामन्यात बाहेर व्हावं लागलं.
2023 मध्ये दमदार कामगिरी
आता 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी सज्ज झालीय. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने सलग नऊ विजय मिळवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. सेमीफायनलमध्ये पुन्हा एकदी टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. 2019 च्या पराभवाचा बदला घेण्याची संधी टीम इंडियाकडे आहे.