दुबई : कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा फटका क्रिकेटलाही बसला आहे. गेल्या २ महिन्यांपेक्षा जास्त काळ क्रिकेट स्पर्धा बंद आहेत. या क्रिकेट स्पर्धा कधी सुरू होणार? हे अजूनही माहिती नसलं तरी आयसीसीच्या क्रिकेट समितीने नवा नियम आणला आहे. कोरोना व्हायरसमुळे भविष्यात सुरू होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांसाठी हा नियम लागू असेल.
कोरोना व्हायरसमुळे क्रिकेटपटूंना आता बॉलला थुंकी लावता येणार नाही. आयसीसीने खेळाडूंना बॉलला थुंकी किंवा लाळ लावायला बंदी घालण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखाली आयसीसीच्या क्रिकेट समितीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक झाली. या बैठकीमध्ये हा निर्णय झाला.
सध्याच्या परिस्थितीमध्ये बॉलला थुंकी लावणं खेळाडूंच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे, त्यामुळे यावर तात्काळ बंदी घालणं गरजेचं आहे, असं मत समितीच्या सदस्यांनी मांडलं.
क्रिकेटमध्ये बॉलला थुंकी लावणं बॉलरसाठी महत्त्वाचं मानलं जातं. थुंकी लावल्यामुळे बॉल चमकायला लागतो आणि यामुळे बॉलरला बॉल स्विंग करायला मदत होते. या नव्या नियमामुळे आता बॉलची चमक गेल्यानंतर बॉल स्विंग होणार नाही, याचा फायदा बॅट्समनना होईल. टेस्ट क्रिकेटमध्ये बॉल रिव्हर्स स्विंग करण्यासाठी खेळाडू बॉलची एक बाजू लाळ किंवा थुंकी लावून चमकवायचे.