मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल याने क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. मानसिक आजारामुळे मॅक्सवेल हा पुढचे काही दिवस क्रिकेट खेळू शकणार नाही. ३१ वर्षांच्या ग्लेन मॅक्सवेलने नुकतीच टी-२० क्रिकेटमध्ये शानदार बॅटिंग केली होती. श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये मॅक्सवेलने ६२ रनची खेळी केली. तर तिसऱ्या टी-२०मध्ये त्याला बॅटिंगची संधी मिळाली नाही. पहिल्या टी-२०मध्ये मॅक्सवेलची ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये निवड झाली नव्हती.
ऑस्ट्रेलियाच्या टीमचे मानसोपचारतज्ज्ञ मायकल लायड म्हणाले, 'मॅक्सवेल त्याच्या मानसिक आजारामुळे अडचणीत आहे. त्यामुळे तो खेळापासून काही काळ लांब राहणार आहे. मॅक्सवेलने हे लगेच ओळखलं आणि त्याने आम्हाला उपचारात मदत केली.'
मॅक्सवेल टीममधून तत्काळ बाहेर गेला आहे, त्याच्याऐवजी डी आर्सी शॉर्टची निवड करण्यात आली आहे. खेळाडूंचं स्वास्थ्य आमच्यासाठी प्राथमिकता आहे. मॅक्सवेलला आमचं समर्थन आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि क्रिकेट व्हिक्टोरिया मॅक्सवेल लवकर बरा व्हावा, यासाठी प्रयत्न करेल, असं आश्वासन ऑस्ट्रेलिया टीमचे कार्यकारी प्रबंधक बेन ओलिव्हर म्हणाले.
'मॅक्सवेलला आणि त्याच्या कुटुंब आणि मित्रांना त्यांचा वेळ द्या. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा सन्मान करा. मॅक्सवेल हा खास खेळाडू आहे आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट परिवाराचा महत्त्वाचा हिस्सा आहे. तो टीममध्ये पुनरामन करेल असा आम्हाला विश्वास आहे,' अशी प्रतिक्रिया ओलिव्हर यांनी दिली.