FIFA World Cup 2018: उपांत्यपूर्व फेरीचा थरार रंगणार

बाद फेरीत धक्कादायक निकालंची नोंद

Updated: Jul 5, 2018, 11:50 AM IST
FIFA World Cup 2018: उपांत्यपूर्व फेरीचा थरार रंगणार title=

मॉस्को : फुटबॉल विश्वचषकाचा थरार आता उपांत्यपूर्व फेरीत येऊन धडकलाय. उपांत्यपूर्व फेरीत चार माजी विजेते संघ असून यजमान रशिया संघही आहे. आता यातील दिग्गज संघ आरामात विजय साकारतात की नवे संघ काही आश्चर्यकारक निकाल नोंदवतात हे पाहणं रंगतदार ठरणार आहे. बाद फेरीत काही धक्कादायक निकालंची नोंद झाली. जर्मनी, स्पेन, अर्जेंटीना, पोर्तुगाल, या विजयाच्या प्रबळ दावेदारांना बाद फेरीतच गाशा गुंडाळायला लागला. 

ब्राझील, फ्रान्स, उरुग्वे आणि इंग्लंड हे माजी विजेते संघ उपांत्यपूर्व फेरीत ताकदवान मानले जात आहेत. तर यजमान रशियानं बाद फेरीत माजी विजेत्या स्पेनला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभवाचा धक्का देत साऱ्यांनाच आश्चर्यचकित केलं. यामुळे आता रशियाही उपांत्य फेरीसाठीच्या शर्यतीत गणला जात आहे. बाद फेरीत अतिशय रंगतदार ठरलेल्या लढतीत फ्रान्सनं अर्जेंटीनाचा धुव्वा उडवला. तर उरुग्वेनं रोनाल्डोच्या पोर्तुगालला गाशा गुंडाळायला भाग पाडलं. 

ब्राझीलनं गतविजेत्या जर्मनीला पराभूत करणाऱ्या मेक्सिकोवर सहज विजय मिळवला. इंग्लंडनं कोलंबियावर पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळवला. तर क्रोएशियानं डेन्मार्कवर, बेल्जियमनं जपानवर तर स्वीडननं स्वित्झर्लंडवर विजय साकारत उपांत्यपूर्व गाठली आहे.  

आता उपांत्यापूर्व फेरीत उरुग्वे विरुद्ध फ्रान्स, ब्राझील विरुद्ध बेल्जियम, स्वीडन विरुद्ध इंग्लंड आणि रशिया विरुद्ध क्रोएशिया यांच्यामध्ये मुकाबले रंगणार आहेत. यातील उरुग्वे विरुद्ध फ्रान्स आमि ब्राझील विरुद्ध बेल्जियम या दोन लढती रोमहर्षक होण्याची शक्यता आहे. 

रोनाल्डो, मेस्सी स्पर्धेतून बाहेर गेल्यामुळे आता ब्राझीलचा नेमार, उरुग्वेचा लुईस सुआरेझ आणि फ्रान्सच्या बाप्पे फुटबॉलप्रेमींना आपल्या खेळाणं मंत्रमुग्ध करतात का हे पहावं लागेल. गेल्या साठ वर्षांपासून युरोपिय भूमीवर एकाही दक्षिण अमेरिकी संघाला विजय साकारता आलेला नाही. यामुळे ब्राझील कशी कामगिरी करणार याची चर्चा चाहत्यांमध्ये आहे. तर स्वीडननं १९९४नंतर प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. आता या आठ संघांतून कोणते चार संघ विजय साकारात उपांत्य फेरी गाठतात यावर फुटबॉलप्रेमींमध्ये पैजा लावणं सुरु झालं आहे.