लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंह धोनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आहे तरी कुठे?

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने.... 

Updated: Aug 15, 2019, 01:44 PM IST
लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंह धोनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आहे तरी कुठे?  title=

मुंबई : भारतीय क्रिकेट दलाचं नेतृत्त्व करणारा संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी गेल्या कीही दिवसांपासून भारतीय सैन्यदलातील १०६ टीए बटालियन (पॅरा) 106 TA Battalion (Para) या तुकडीसोबत सैन्यदलाच्या सेवेत रुजू झाला होता. मानाच्या लेफ्टनंट कर्नल या पदावर धोनीने त्याची जबाबदारी पार पाडली. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानेही त्याने नव्याने प्रस्थापित झालेल्या लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वसामान्यांच्या आणि सैन्यदल तुकडीच्या सोबतीने हा खास दिवस साजरा केला. 

५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने जम्मू काश्मीर येथे अनेक वर्षांपासून लागू करण्यात आलेला अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा निर्णय दिला. ज्यानंतर जम्मू काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश आकारास आले. आतापर्यंतचा हा एक ऐतिहासिक निर्णय असल्याची प्रतिक्रिया सर्वांनीच दिली. मुख्य म्हणजे निर्णयानंतर सर्वत्र तणावाची परिस्थिती असतेवेळी महेंद्रसिंह धोनी त्याच भागात सेवेत रुजू होता.

दरम्यान, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने धोनी बुधवारी या भागात पोहोचला जेथे त्याचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. ज्यानंतर सैन्यदल अधिकाऱ्यांशी संवाद साधत पुढे त्याने सेना रुग्णालयालाही भेट दिली. जेथे त्याने रुग्णांशीही संवाद साधला. सोशल मीडियावर या क्षणांचे काही फोटोही व्हायरल होत आहेत. 

धोनी जितके दिवस सैन्यदलासोबत वावरत होता ते सर्वच दिवस तो एका जवानाचं आयुष्य जगत असल्याचं पाहायला मिळालं. आपली सेवा बजावणाऱ्या धोनीचा हा अंदाज खऱ्या अर्थाने साऱ्यांचीच मनं जिंकून गेला. या सेवेसाठी त्याने क्रिकेट जगतातून दोन महिन्यांची सुट्टी घेतली होती. ज्यामुळे सध्या सुरु असणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यांधमध्ये त्याचा सहभाग नाही.