मेलबर्न : जागतिक क्रमवारीत अव्वल असणारा टेनिसपटू नोव्हाक जोकोविचला पुन्हा एकदा मोठा झटका लागला आहे. कोरोना प्रतिबंधक लस न घेतल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या सरकारने त्यााच व्हिसा पुन्हा एकदा म्हणजेच दुसऱ्यांदा रद्द केला आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या सरकारकडून जोकोविचच्या व्हिसावर तीन वर्षांची बंदी घालण्याचीही शक्यता वर्तवण्यात येतेय.
यासंदर्भात मंत्री एलेक्सक हॉक यांनी माहिती दिली आहे की, त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा वापर करून नोव्हाक जोकोविचचा व्हिसा रद्द केला आहे. जनहितार्थ त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाच्या सरकारच्या या निर्णयानंतर जोकोविचला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळणे कठीण झालं आहे. ही स्पर्धा 17 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या टूर्नामेंटच्या ड्रॉमध्ये जोकोविचचा समावेश करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियन सरकारच्या निर्णयाविरोधात जोकोविचचे वकील कोर्टात धाव घेऊ शकतात. जोकोविचचा व्हिसा पहिल्यांदा रद्द झाला तेव्हा तो कोर्टात गेला आणि तिथे त्याला दिलासा मिळाला.
नोव्हाक जोकोविचने कोरोना प्रतिबंधक लस न घेतल्याने त्याच्या व्हिसावर वाद निर्माण झाला आहे. त्याला लस न घेता ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळण्यासाठी टेनिस ऑस्ट्रेलिया आणि व्हिक्टोरिया राज्य सरकारकडून परवानगी मिळाली होती. त्यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियाचा व्हिसा घेतला. पण ऑस्ट्रेलियन बॉर्डर फोर्सने ही परवानगी रद्द करून मेलबर्नचा व्हिसा रद्द केला.