मुंबई : आयपीएलच्या पंजाबच्या टीमचा कर्णधार आर.अश्विनने वेगळं व्हायचा निर्णय घेतला आहे. पंजाबच्या टीमचे सहमालक नेस वाडिया यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आम्ही आणि आर.अश्विनने वेगळं व्हायचं ठरवलं असल्याचं वाडिया पीटीआयशी बोलताना म्हणाले. अश्विन हा आयपीएलच्या मागच्या दोन मोसमात पंजाबचा कर्णधार होता. आता २०२०च्या मोसमात केएल राहुल हा पंजाबच्या टीमचा कर्णधार व्हायची शक्यता आहे. अनिल कुंबळे यांची याआधीच पंजाब टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.
अश्विनबाबत पंजाबच्या टीमचं काही फ्रॅन्चायजीसोबत डील सुरु आहे. तसंच अश्विन हा दिल्लीच्या टीमकडून खेळेल, अशा शक्यताही वर्तवल्या जात आहेत. अश्विनला दिल्लीला देऊन दिल्लीचे ट्रेन्ट बोल्ट आणि जे सुचिथ हे खेळाडू पंजाबला मिळतील, असं बोललं जातंय.
आम्ही काही टीमशी बोलत आहोत, आम्हाला आणि अश्विनला जे फायद्याचं असेल, तसा निर्णय होईल. दोघांसाठी डील चांगलं झालं पाहिजे, असं नेस वाडिया म्हणाले. अश्विनसारखा खेळाडू प्रत्येक टीमला हवाहवासा वाटतो. अश्विन दिल्लीकडून खेळेल, असं बोललं जातंय, पण आमची काही टीमशी बोलणी सुरु आहेत. गोष्टी स्पष्ट झाल्यानंतर आम्ही याची घोषणा करु, अशी प्रतिक्रिया नेस वाडिया यांनी दिली.
अश्विनच्या नेतृत्वात दोन्ही मोसमात पंजाबने धडाक्यात सुरुवात केली, पण नंतर मात्र टीम ढेपाळली. दोन्ही मोसमात पंजाबच्या टीमला प्ले-ऑफही गाठता आलं नाही. क्रिस गेल, केएल राहुल, मुजीब-उर-रहमान, डेव्हिड मिलर आणि अश्विन यांच्यासारखे स्टार खेळाडू असतानाही पंजाबची कामगिरी निराशाजनक राहिली.
आयपीएलमध्ये अश्विन चेन्नई आणि पुण्याच्या टीमकडूनही खेळला आहे. १४ नोव्हेंबरआधी अश्विनचं डील पंजाबच्या टीमला करावं लागणार आहे, कारण डील करण्याचा हा शेवटचा दिवस आहे. १९ डिसेंबरला कोलकात्यामध्ये आयपीएलच्या खेळाडूंचा लिलाव होणार आहे.