नवी दिल्ली : सध्या फेसबुकवर हा वरील फोटो चांगलाच व्हायरल होतोय. अनेकांनी हा फोटो पाहिला असेल लाईक तसेच शेअरही केला असेल. मात्र या फोटोमागची कहाणी तुम्हाला माहीत आहे का?...ही कहाणी वाचल्यानंतर तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
जेव्हा डेन्मार्कच्या समाजसेविका अंजा रिंगरेन लोवेन नायजेरियामध्ये फिरण्यासाठी गेल्या होत्या तेव्हा या नायजेरियन मुलाची कहाणी जगासमोर आली. होप असे या मुलाचे नाव आहे. तेथे फिरत असताना त्यांनी या आफ्रिकन मुलाला पाहिले जो रस्त्याच्या एका कडेला रडत होता. तो लहानगा भुकेला होता मात्र कोणीही त्याला खायला देत नव्हते. लोवेन यांनी त्याला पाहिले आणि झटकन आपल्याकडील वेफर्स त्याला खायला दिले. मुलाचे रडणे बंद झाले मात्र डोळ्यातील अश्रू काही थांबत नव्हते.
गेल्या दोन दिवसांपासून तो चिमुरडा भुकेला होता. वेफर्स खाल्ल्यानंतर लोवेन यांनी बाटलीतील पाणी त्याला पाजले. या मुलाबद्दल त्यांना आसपास चौकशी केली असता लोकांनी सांगितले की हा राक्षस आहे आणि म्हणूनच याला गावातून बाहेर काढण्यात आलंय. येथील आदिवासी समाजात अशा अनेक प्रथा परंपरा आहेत ज्यांचे बळी हे चिमुरडे होतात. येथे अशी अनेक मुले आहेत ज्यांना राक्षस असल्याचे सांगून गावातून बाहेर काढले जाते आणि अशा मुलास त्यांच्या आईवडिलांनी घरात घेतले तर त्यांची हत्या केली जाते.
सध्या होपचा सांभाळ लोवेन करत आहेत. अशा अनेक मुलांसाठी लोवेन काम करतात आणि आयुष्यभर त्या हे कार्य करत राहणार असल्याचेही त्या सांगतात.