मुंबई : अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सध्या एका मोबाईल गेमनं सर्वांनाच वेड लावलं आहे. पोकेमॉन गो या व्हर्च्युअल आणि रिअॅलिटीची सांगड घालणारा हा गेम सगळेच ऑनलाईन रेकॉर्ड मोडणार असं दिसतं आहे. फक्त आठ दिवसांमध्येच 10 लाख यूजर्सनी हा गेम डाऊनलोड केला आहे. या गेमला साडेसात अब्ज डॉलर्सची मार्केट व्हॅल्यू आहे.
पोकेमॉन गो हा एक ऑगमेंटेड रियॅलिटी (AR) बेस्ड मोबाईल गेम आहे. आयओएस आणि अँड्रॉईड मोबाईलवर हा गेम उपलब्ध आहे. व्हॉट्सऍप आणि इन्स्टाग्रामलाही यानं मागे टाकलं आहे. अँड्रॉईडवर सरासरी 43 मिनिटं 23 सेकंद पोकेमॉन गो सुरू असतो. तर व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामचा सरासरी वापर 30 मिनिटं 27 सेकंद आहे.
अमेरिकेमध्ये लॉन्चिंगच्या 2 दिवसांतच 5 टक्के अँड्रॉईड डिव्हाईसेसवर हा गेम डाऊनलोड झाला. पोकेमॉन गोच्या युजर्सची संख्या दररोज 3 टक्क्यांनी वाढत आहे. यामध्ये सर्वात आघाडीवर असलेल्या ट्विटरच्या युजर्समध्ये दररोज 3.6 टक्क्यांनी वाढ होत आहे.
पोकेमॉन गो हा फ्री-टू-प्ले गेम 18 ते 25 वयोगटामध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. पोकेमॉन गोमध्ये तुम्हाला वास्तवातल्या जगात फिरून पोकेमॉनला पकडायचं असतं. या गेममध्ये अनेक लेव्हल आहेत. या लेव्हल पार करताना मजेशीर अनुभव येतात.
जेव्हा तुम्ही वास्तवातल्या जगात बाहेर पडाल, तेव्हा तुम्हाला GPSवर पोकेमॉनच्या दिशेचा अंदाज मिळतो. तुम्ही जितके जास्त पोकेमॉन जमवाल, तेवढे या गेममध्ये पुढे जाता.
हा गेम काही तुम्ही एकट्यानं खेळण्याच नाही. तुमच्या आसपास असलेल्या आणखी एखाद्या खेळाडूलाही तुम्हाला मिळालेलीच पोकेमॉनची दिशा मिळेल, त्यामुळे त्याच्या आधी पोकेमॉनला पकडण्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील.
आपल्या मोबाईलवरच प्रतिस्पर्ध्याशी झगडून तुम्हाला पोकेमॉन पकडावा लागेल. या लढाईत जो जिंकेल, त्याला पोकेमॉन मिळेल. पोकेमॉन भारतामध्ये येण्यासाठी मात्र थोडी वाट बघावी लागणार आहे.