www.24taas.com, मुंबई
विधानभवन परिसरात पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण करणारे `बहुजन विकास आघाडी`चे आमदार क्षितिज ठाकुर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. आपल्याकडील मोबाइल फुटेज आणि सीडी पत्रकारांकडे सुपुर्त करत सर्व प्रकरणाची जबाबदारी स्वतःवर घेतली. जर या प्रकरणात मी दोषी असेन, तर माझ्यावर कारवाई करा, मी तयार आहे असंही ठाकूर म्हणाले.
वांद्रे-वरळी सी- लिंक येथे काल सोमवार रोजी आमदार क्षितिज ठाकूर यांची कार अडवली होती. कारची वेगमर्यादा अधिक असल्याबद्दल त्यांना ७०० रुपये दंड ठोठावण्यात ला होता. यावर मिळालेल्या पावतीमध्ये दोन कलमं लिहिली होती. दुसरं कलम कशासाठी याचं उत्तर जेव्हा आपण सूर्यवंशीना विचारलं, तेव्हा त्यांनी आपल्याला शिवीगाळ केली असं क्षितीज ठाकुर यांचं म्हणणं आहे. जर लोकप्रतिनिधींशी अशा भाषेत सूर्यवंशी बोलत असतील, तर सामान्य माणसाशी कसे बोलत असतील? असा सवालही ठाकुर यांनी केला होता.
आज हक्कभंगाचा प्रस्ताव मांडतानाही प्रेक्षक गॅलरीतून सूर्यवंशी यांनी आक्षेपार्ह हातवारे करत आपल्याला धमकी दिल्याचं क्षितीज ठाकूर यांचं म्हणणं आहे. सूर्यवंशींना जी मारहाण केली गेली, त्यात इतर आमदारांनी मला पाठिंबा दिला. मात्र या हाणामारीची संपूर्ण जबाबदारी माझी आहे, असं ठाकुर यांनी म्हटलं आहे. तसंच, जर माझी काही चूक आढळली, तर मी उद्या राजीनामा देईल. माझी लढाई पोलीस खात्याशी नाही, तर अशा वृत्तीशी आहे. आरेरावीने वागणाऱ्या सूर्यवंशींना धडा शिकवणं आवश्यक होतं. त्याबद्दल मला खेद नाही. मी सूर्यवंशींची माफी मागणार नाही. असं क्षितीज ठाकुर यांनी स्पष्ट केलं.