बंगळुरु : अखेरच्या चेंडूपर्यंत अटीतटीच्या रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रायजिंग पुणे सुपरजायंटवर विजय मिळवला आणि आयपीएलच्या दहाव्या हंगामाचे जेतेपद मिळवले.
शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगला होता. अखेरच्या षटकातही कोण जिंकेल याची श्वाशती देता येत नव्हती. अखेरच्या तीन चेंडूत पुण्याला विजयासाठी ७ धावांची गरज होती. मात्र त्यांना केवळ ५ धावा करता आल्या.
दहाव्या हंगामात आतापर्यंतच्या पुण्याविरुद्धच्या तीनही सामन्यात मुंबईला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे अंतिम सामन्यात तरी मुंबई हा इतिहास पुसेल अशी आशा समस्त मुंबईकरांना होती. मुंबईच्या संघाने अंतिम सामन्यात हा इतिहास पुसून टाकत पुण्यावर अखेर विजय मिळवलाच.
मुंबईने टॉस जिंकताना प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. मात्र या निर्णयाचा त्यांना फारसा फायदा उचलता आला नाही. ७९ धावांत मुंबईचे सात फलंदाज माघारी परतले होते. यावेळी कृणाल पंड्या संकटकाळात धावून आला आणि त्याने ४७ धावांची जबरदस्त खेळी केल्याने मुंबईला १२९ धावा करता आल्या. मुंबईचे सुरुवातीचे सर्व फलंदाज अपयशी ठरले.
मुंबईने विजयासाठी ठेवलेले हे माफक आव्हान पूर्ण करताना मात्र पुण्याची दमछाक झाली. पुण्याला २० षटकांत १२८ धावा करता आल्या. या अंतिम सामन्यात केवळ एका धावेने पुण्याला पराभवास सामोरे जावे लागले.