www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सचिन तेंडूलकरची जादू जरी आता क्रिकेटच्या मैदानावर दिसणार नसली तरी चाहत्यांच्या मनावर अजूनही कायम आहे आणि त्यामुळेच सचिननं रिटायर्ड झाल्यावरही आणखी एक रेकॉर्ड केलाय. हा रेकॉर्ड आहे सचिनच्या स्टँप विक्रीचा....
सचिन तेंडुलकरच्या नावाने भारतीय टपाल खात्यानं काढलेल्या तिकिटाला नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय. गेल्या दोन महिन्यात केवळ या तिकीटाच्या विक्रीमधून पोस्ट खात्याच्या खात्यात तब्बल एक कोटी रुपयांची भर पडलीय.
१४ नोव्हेंबरला वानखेडेवर सचिन शेवटची टेस्ट खेळला, त्यावेळी सचिनच्या हस्ते पोस्टाच्या स्टँपचं अनावरण करण्यात आलं. त्यातले काही स्टँपस पुणे विभागातल्या पोस्ट ऑफिसमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले होते आणि अवघ्या दोनच महिन्यांमध्ये या स्टँप्सपैंकी जवळपास ९०% म्हणजेच तब्बल एक कोटी किंमतीच्या स्टँपसची पुण्यात विक्री झालीय. आत्तापर्यंत कुठल्याही व्यक्तीच्या स्टँपची विक्री इतक्या जलद गतीनं झाली नव्हती, असं पुण्याच्या पोस्टातले अधिकारी एल. डी. कुंभार यांनी म्हटलंय.
सचिन ची लोकप्रियता लक्षात घेता उरलेले स्टँपसही लवकरच संपतील असा अंदाज आहे. सचिनच्या या स्टँपसच्या विक्रीमुळे टपाल खात्याचाही काही कोटींचा फायदा झालाय. एकूणच काय तर निवृत्तीमुळे क्रिकेटच्या मैदानावर जरी सचिनचे रेकॉर्ड्स होणार नसले तरी मैदानाबाहेर सचिनचे रेकॉर्ड होतच राहतील, यात शंका नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.