नाशिकमधल्या `होर्डिंग्ज`वर संक्रांत

नाशिक महापालिका आयुक्तांनी पुन्हा एकदा शहरातील अनधिकृत होर्डींग्ज लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. यंदा तर आजचा अल्टीमेटम दिला असून यापुढे फलकबाजी करणाऱ्यावर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा आयुक्तांनी दिलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 13, 2012, 07:45 PM IST

www.24taas.com, नाशिक
नाशिक महापालिका आयुक्तांनी पुन्हा एकदा शहरातील अनधिकृत होर्डींग्ज लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. यंदा तर आजचा अल्टीमेटम दिला असून यापुढे फलकबाजी करणाऱ्यावर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा आयुक्तांनी दिलाय. मात्र आजवरचा महापालिकेचा अनुभव पाहता ‘नेमिची येतो पावसाळा’ या युक्ती प्रमाणे दोनचार दिवस मोहीम चालेल नंतर थंड होईल यावर नाशिककरांचा ठाम विश्वास आहे.
नाशिकमध्ये चौकाचौकात, सिग्नलवर, वळणावर चमकोगिरी करणा-या नेत्यांची होर्डिंग्ज बारा महिने लागलेली असतात. त्यावरुन अपघात आणि हाणामारीच्या घटनाही घडल्यात. असं काही घडलं की महापालिका घाईघाईनं होर्डिंग्ज हटवण्याचे आदेश देते. पुन्हा दोन चार दिवसांनी कुठलातरी सण किंवा कुठल्या तरी नेत्याचा वाढदिवस येतो. आणि पुन्हा शहरभर शुभेच्छांची होर्डिंग लागतात. आता पुन्हा महापालिकेनं होर्डिंग हटवण्याचे आदेश दिलेत. होर्डिंग हटवा नाहीतर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचं फर्मान महापालिकेनं सोडलंय.

नाशिककर या होर्डिंगबाजीला पुरते वैतागलेत. यावेळी तरी महापालिकेनं कायमस्वरुपी कारवाई करावी, अशी त्यांची इच्छा आहे. आता महापालिकेचा हा इशारा होर्डिंग बहादर किती गांभीर्यानं घेतात आणि मनपा किती दिवस आणि किती कडक अंमलबजावणी करते, याकडे नाशिककरांचं लक्ष लागलंय..