धुळे : तिला डास चावला आणि तिचे आयुष्यच उध्वस्त झाले. राज्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. आरोग्य यंत्रणा निद्रीस्त असल्याचे दिसून येत आहे. अनेकांचे बळी जाऊनही प्रशासन ढिम्मच आहे. तिचे लग्न ठरले होते. तिचे लग्न दोन महिन्याने होणार होते. मात्र, त्याआधीच तिच्यावर काळाने झडप घातली.
डेंग्यूवर उपचार घेत असलेल्या छाया दिलीप कानकाटे (२१) या तरुणीचा बुधवारी २६ रोजी सकाळी खासगी रूग्णालयात मृत्यू झाला. छायाचे देवपूरातील तरुणाशी विवाह निश्चित झाला होता. २९ जानेवारी २०१५ला तरुणीचा विवाह होणार होता. परंतु याआधीच डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
माल मापाडी परिसरात ती राहत होती. काही दिवसांपूर्वी तिला डेंग्यूची लागण झाली होती. उपचारासाठी शहरातील खासगी रूग्णालयात तिला दाखल करण्यात आले. हमाल मापाडी परिसरात या घटनेमुळे शोक व्यक्त करण्यात आला. महापौरांच्या प्रभागातच तिचे कुटुंबीयांचे वास्तव्य आहे. छायाचे वडील दिलीप कानकाटे हे शहरातच हमाली काम करतात. दोन लहान भाऊ शिक्षण करून दुकानात काम करीत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.