www.24taas.com,धुळे
सिंचनाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. नारळ फोडून धरणांचं भूमीपूजन केलं जातं, मात्र सिंचन होतच नाहीये. अशा प्रकारच्या भूमिपूजनांमधून लोकांना फक्त स्वप्नं दाखवली जातात. त्यामुळे राज्यात सिंचनाचे प्रकल्प पुढच्या १५ वर्षात पूर्ण होणं शक्य नाही, असं सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी पुन्हा अजित पवारांना लक्ष्य केलंय.
धुळे जिल्ह्यातील शिरपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या १३व्या सिंचन परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. तर राज्यात महिन्याभरात सूक्ष्म सिंचन धोरण राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये शेतक-यांना ठिबक सिंचनासाठीचे अनुदान लवकर मिळण्याची व्यवस्था करण्यात आलीय, अशी माहिती कृषी मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी दिली.
राष्ट्रवादीवर सिंचनाच्या मुद्यावरुन टीका करत काँग्रेसनं स्वत:च सिंचनासाठी धोरण राबवण्यास सुरुवात केल्याचं दिसतंय. दरम्यान, आर आर पाटील तथा आबा यांनी काँग्रेसला जोरदार चिमटा काढला आहे. ते म्हणतात, पूर्वी काँग्रेसमध्ये इंग्रजांविरोधात लढणारे नेत होते. त्यामुळे त्यांना स्वातंत्र्य चळवळीत तुरूंगवास भोगावा लागला. आता परिस्थिती वेगळी आहे. भ्रष्टाचार केल्यामुळे काँग्रस नेत्यांना आज तुरूंगाची हवा खावी लागत आहे.