www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
चंद्रपूर महानगरपालिकेने २०९ कोटी २८लाखांचा अर्थसंकल्प मंजूर केला. या अर्थसंकल्पात पाळीव कुत्र्यांवर वर्षाकाठी २०० रूपयांचा कर लावून महानगरपालिकेने शहरवासियांना आश्चर्याचा धक्का दिलाय. मनपाच्या या निर्णयावर सामान्य नागरिकांसह विरोधकांनीही नाराजी व्यक्त केलीय.
महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेने अनोखा मार्ग अवलंबलाय़. पाळीव प्राणी कर आकारून पालिकेने आश्चर्याचा धक्का दिलाय. शहरातल्या मोकाट कुत्र्य़ांच्या नसबंदीवर येणारा खर्च वाढल्याचं कारण देत स्थायी समितीने पाळीव कुत्र्यांवर कर लावण्याचा निर्णय घेतलाय.
स्थायी समितीने प्रत्येक कुत्र्यामागे २००रूपयांचा कर लावलाय. मात्र गाय म्हैस या प्राण्यांप्रमाणे कुत्र्याकडून कुठलंही उत्पन्न मिळत नाही, त्याच्या देखरेखीवरच वर्षाकाठी खर्च येतो असा दावा चंद्रपूरकरांनी केलाय. सामान्य नागरिकांप्रमाणेच विरोधकांनीही या निर्णयाला विरोध केलाय.
मोकाट कुत्र्यांना जंगलात सोडण्याचा निर्णय चंद्रपूर महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वीच घेतला. त्यानंतर तो त्यांना मागे घ्यावा लागला. त्यानंतर पालिकेने मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीची मोहीम राबवलीय. मात्र आता या नसबंदीचा खर्च पाळीव कुत्र्य़ांच्या मालकांकडून वसूल करण्याचा पालिकेचा इरादा आहे. पालिकेने हा निर्णय घेऊन नाराजी मात्र ओढवून घेतलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.