www.24taas.com, झी मीडिया, शेगाव
संत नगरी मध्ये तयार होणाऱ्या शेगाव कचोरीला गुणवत्तेसाठी आयएसओ मानांकन मानांकन प्राप्त झाले असून आता ही कचोरी साता समुद्रापार विदेशात जाणार असून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नगरीत पुन्हा एक मानाचा तुरा लागला आहे.
देशाच्या फाळणीनंतर तीरथराम शर्मा नामक व्यक्ती पंजाबातून शेगावांत पोहोचले. चरितार्थ चालविण्यासाठी त्यांनी शेगाव रेल्वे स्टेशनवरील एका स्टॉलवर हॉटेल सुरू केले. १५ जून १९५० रोजी आपल्या पाच मुलांच्या मदतीने त्यांनी खास पद्धतीने तयार केलेल्या कचोरीची विक्री सुरू केली. शेगावला संत गजानन महाराजांच्या समाधीदर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला या कचोरीने भूरळ घातली. तेव्हापासून ही कचोरी शेगाव कचोरी म्हणून विदर्भासह सर्वत्र प्रसिद्ध झाली. आता त्यांची तिसरी पिढी हा व्यवसाय त्याच पद्धतीने चालवत आहे. या कचोरीचे वैशिष्ट म्हणचे ह्या काचोरीत तेल अतिशय कमी असते त्यामुळे ही कचोरी तीन दिवसांपर्यंत राहते. मागील तीन महिन्यां आगोदर ही कचोरी एका ग्राहकाने जपानला सुद्धा नेली होती.
शेगाव येथे गेल्यावर्षी मुंबई येथील एक न्यायाधीश कामानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी गगन शर्मा यांच्या स्टॉलवरील कचोरीचा स्वाद अनुभवला. त्यांनीच शर्मा यांना मानांकनाबाबत सांगितले. शर्मा यांनी या न्यायाधीशांनाच याबाबत मदतीचे आवाहन केले. त्यानंतर या न्यायाधीशांनी मानांकन देणाऱ्या संस्थेला कचोरीबाबत कळविले. मार्च २०१३ मध्ये शेगाव कचोरीचे ऑडिट करण्यासाठी खास चमू शेगावात येऊन गेली. गुणवत्ता, सेवा, स्वच्छता आदी निकष तपासल्यानंतर या संस्थेने शेगाव कचोरीला आयएसओ 9001;2008 मानांकन दिले आहे. २०१६ पर्यंत हे मानांकन असेल. त्यानंतर पुन्हा कचोरीचा दर्जा तपासला जाईल.
आजही ह्या कचोरी ती रुचकर चव कायम असून भाविकांना शेगावात आल्यानंतर कचोरी खाण्याचा मोह रोखू शकत नाही कचोरी बरोबरच कचोरी सँडवीच हा नवीन पदार्थ शर्मा यांनी सुरु केला असून हा पदार्थ सुद्धा ग्राहकान्न फार आवडत आहे.
तीर्थराम शर्मा यांची चौथी पिढी ह्या व्यवसायात येत असून गगन शर्मा यांच्या मुलाने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केलेला असून विदेशातील जॉब सोडून त्याने या व्यवसायातच राहणे पसंत केले आहे.
पुणे येथील उद्योजक अविनाश देव यांच्या मदतीने न्यूयॉर्क (अमेरिका) येथे शेगाव कचोरी पोहोचली आहे. सुमारे ३०० ठिकाणी ही कचोरी अमेरिकेत पोहोचणार आहे. विदेशात पाठविली जाणारी कचोरी आठवडाभर खराब होणार नाही, अशा पद्धतीने तयार होणार आहे. दुबईतील एका हॉटेल समूहानेही शेगाव कचोरीसाठी शर्मा यांच्याशी करार केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.