www.24taas.com, गडचिरोली
नक्षलवाद गडचिरोलीत आणि नक्षलविरोधी बटालियनची स्थापना मात्र कोल्हापुरात होत असल्याचा या उफराटा प्रकार राज्याचे गृहखातं करत आहे. या प्रकारावर गडचिरोलीतल्या बेरोजगार युवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनीच ही बटालियन पळवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे.
देशाच्या ज्या भागात नक्षल समस्येने उग्र रूप धारण केलं आहे. त्या भागात नक्षलविरोधी भारत राखीव बटालियनची स्थापना करण्याचं केंद्र सरकारनं ठरवलंय. महाराष्ट्रात अशा ३ राखीव बटालियन स्थापना करण्याची मंजुरी केंद्र सरकारकडून मिळाली आहे. त्यातील २ बटालियन उभारण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यातील एक गोंदियात तर दुसरी चक्क नक्षल समस्येचा मागमूस नसलेल्या कोल्हापूर येथे स्थापन होणार आहे. यामुळं सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या गडचिरोलीच्या आदिवासी युवकांच्या आशेवर पाणी फेरलं गेलंय. राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे कोल्हापूरचे असल्यामुळं त्यांच्यावर ही बटालियन पळवल्याचा आरोप करण्यात येत आहे.
७६५ तरुणांची भरती या टप्प्यात होणार आहे. त्यासाठी लागणारी सुमारे ६० कोटी रूपयांची गुंतवणूकही गडचिरोलीबाहेर जाणार आहे. नक्षल समस्या ही इथल्या जंगलाशी आणि आर्थिक बाबींशी, बेरोजगार हातांशी निगडीत असल्याचं अजून सरकारला कळलं नसल्याचं दिसून येतंय.