मुंबई : महायुतीतील वादळ आता सोशल मीडियावर रंगू लागले आहे. शिवसेना-भाजप युतीचा विस्तार करताना छोटे पक्ष सोबत घेऊन 'महा'विस्तार करण्यात आला. मात्र, जागा वाटपाबाबतचे घोडे अजून गंगेत न्हाले नाही. याचवेळी भाजप अध्यक्ष अमित शहा उद्या मुंबईत येत आहे. त्याचवेळी सोशल मीडियावर 'शहाणा हो...'चे पोस्टर झळकतेय.
या पोस्टरवर म्हटलेय, हा फोटो आठवतो का? हा साहेबांचा (बाळासाहेब ठाकरे) महाराष्ट्र आहे. अब महाराष्ट्र, सब महाराष्ट्र. मात्र, 'अब महाराष्ट्र, सब महाराष्ट्र' हे भाजपचे कॅम्पियन आहे. याच कॅम्पियनला हे चोख उत्तर आहे, असं सोशल मीडीयावर चर्चा आहे. मात्र, शिवसेनेने हे पोस्टर केलेले नाही. पोस्टरवर 'पीके' असा स्टॅम्प दिसत आहे. कोण आहे हा 'पीके'? याची चर्चा सध्या व्हाट्सअॅप सुरु आहे. हे पोस्टर झूम केल्यावर त्याचा कर्ता कोण आहे ते स्पष्ट होते. 'पीके' म्हणजे प्रशांत कुडाळकर.
'शहा'णा हो मधील शहाला हिरवा रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हा टोमणा भाजपला असल्याची चर्चा आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा मुंबईत येत आहे. त्याचवेळी हे पोस्टर व्हाट्सअॅपवर फिरत असल्याने भाजपला हा इशारा असल्याचे बोलले जात आहे.
भाजप अध्यक्ष अमित शहा 'मातोश्री'वर जाणार नाही, अशी चर्चा आहे. त्याचवेळी हे पोस्टर व्हाट्सअॅपवर फिरत आहे. यामध्ये आधीचे भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग, गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे 'मातोश्री'वर जाऊन आर्शीवाद घेतले होते. हे या पोस्टरवरून दाखवून देण्यात आले आहे. त्यामुळे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी यातून काय तो बोध घ्यावा, हेच दाखवून देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. आजपर्यंत 'मातोश्री'वर जाऊन शिवसेना-भाजप युती टिकविण्यात आली आहे.
मात्र, केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर शिवसेनेला खिंडीत पकडण्याचा डाव भाजपकडून केला जात असल्याची चर्चा आहे. याचाच एक भाग म्हणून अमित शहा हे 'मातोश्री'वर जाणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे युतीतील तणाव वाढून युती तुटेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.