मुंबई : राज ठाकरे स्वत: विधानसभा निवडणूक लढवणार की नाही, अजूनही निश्चित नाही.... निवडणुकीबाबतच्या त्यांच्या विधानाचा विपर्यास केल्याचा खुलासा राज यांनी केलाय.... त्यामुळ कनफ्युजनमध्ये आणखी भरच पडलीय.
यु टर्न घेऊन संभ्रम वाढवायचा आणि मग विधानाचा विपर्यास केल्याचा खुलासा करायचा. हे आता राज ठाकरेंच्या बाबतीत सवयीचंच झालंय. मी स्वतः विधानसभेची निवडणूक लढवेन, अशा खणखणीत घोषणेला तीन महिने पुरे होत नाहीत, तोच निवडणूक लढवायचं नक्की नाही, अशी भूमिका राज ठाकरेंनी नागपुरात बोलताना घेतली. आणि त्यावरुन चर्चा सुरू होताच पुन्हा विधानाचा विपर्यास केल्याचंही त्यांनी जाहीर करुन टाकलं. राज यांची यू टर्न घेण्याची ही काही पहिली वेळ नाही.
राज यु टर्न
१. मनसे स्थापन करताना भावनिक राजकारण न करता विकासाचं राजकारण करण्याचं धोरण राज ठाकरेंनी जाहीर केलं. पण २००९ची निवडणूक मराठी अस्मितेच्या भावनिक मुद्यावर लढवली.
२. पुन्हा मोदी फॅक्टरनंतर विकासाची ब्ल्यू प्रिंट आणण्याची भाषा सुरू झाली.
३. रेल्वे बॉम्बस्फोटातल्या आरोपींचे वकिलपत्र घेण्या-यांना चिरडून टाका, अशी गर्जना राज ठाकरेंनी जाहीर सभेत केली होती. पण कोर्टानं सुमोटो याचिका दाखल करून घेतल्यानंतर 'मी असं बोललोच नव्हतो,' असा खुलासा करत माफीनामाही सादर केला.
४. उत्तर भारतीयांविरोधात आक्रमक होत, हिंदी-इंग्रजी वाहिन्यांना दरवाजे बंद आणि फक्त मराठीतच बोलण्याची गर्जना केली. पण गुजरात दौ-यानंतर भूमिकेत अचानक बदल झाला.
५. हिंदी भाषेतला संवाद आणि हिंदी-इंग्रजी वाहिन्यांना हिंदीतून मुलाखतीही सुरू झाल्या.
६. टोलच्या मुद्यावर व्यापक आंदोलन हाती घेतलं, टोलधोरण जाहीर करण्याची मागणी केली, पण टोलधोरण जाहीर झाल्यानंतर कोणतीच भूमिका घेतली नाही.
७. भाषिक अस्मितेवरून अमिताभ बच्चन यांच्यावर टीका केली, कार्यकर्त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या घरावर त्यावेळी सोडावॉटरच्या बाटल्याही फेकल्या. नंतर त्याच अमिताभ बच्चन यांना मनसेच्या व्यासपीठावर बोलावलं, आणि 'झालं गेलं गंगेला मिळालं' असं जाहीर करुन टाकलं.
८. पेडररोड उड्डाणपूल आणि पाकिस्तानी कलावंतांच्या मुद्यावरून पार्श्वगायिका आशा भोसलेंशी राज ठाकरेंचा खटका उडाला होता. पण नंतर आशाताईंच्या वाढदिवसानिमित्तानं आशा भोसलेंची घरी जाऊन भेट घेतली.
९. लोकसभा निवडणुकीनंतर मोदींची हवा विरली, असं वक्तव्य केलं आणि नंतर 'मी असं बोललोच नाही' असा खुलासा करण्याची पाळी राज ठाकरेंवर आली.
१०. मराठी अस्मितेच्या आंदोलनावरून राज ठाकरेंवर ठिकठिकाणी खटले सुरु आहेत. मात्र आपण घटनास्थळी हजर नव्हतो, त्यामुळं मुक्त करण्यात यावं, अशी कोर्टापुढे भूमिका मांडली.
११. विधानसभेला स्वतः निवडणुकीला उभा राहणार, अशी खणखणीत घोषणा लोकसभा निवडणुकीनंतरच्या जाहीर सभेत केली. पण महाराष्ट्र हाच माझा मतदारसंघ, मग एका मतदारसंघातून निवडणूक कशी लढवायची? शिवाय ठाकरेंनी कधी निवडणूक लढवलेली नाही, याचे दाखले देत यु टर्न घेतला.
लोकसभेतल्या मानहानीकारक पराभवानंतर मनसेला विधानसभेसाठी चांगलाच घाम गाळावा लागणार आहे. पर्यायानं मनसेचं अस्तित्व पणाला लागणार आहे. अशा निर्णायक परिस्थितीत वारंवार यू टर्न घेतल्यानं कार्यकर्त्यांमधला संभ्रम तर मोठ्या प्रमाणात वाढतोच. पण राज यांच्या कुठल्याही भूमिकेवर विश्वास ठेवायचा तरी कसा, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.