www.24taas.com,झी मीडिया,मुंबई
रेल्वेचे तिकिट वेटिंग असेल तर तुम्हाला प्रवास करता येणार नाही, असा रेल्वेने निर्णय घेतला खरा. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्याबाबत काहीही हालचाल केलेली नाही. तसे लेखी आदेशही काढण्यात आलेले नाहीत. याबाबत रेल्वेतील काही अधिकाऱ्यांनी तसे स्पष्टीकरण दिलेय. रेल्वे मंत्रालयाकडून आम्हाला लेखी किंवा असे परिपत्रक आलेले नाही, अशी माहिती काही अधिकाऱ्यांनी दिली.
तुमच्याकडे रेल्वेचे तिकिट वेटिंग असेल तर मेल-एक्स्प्रेस गाड्यांमधून प्रवास केल्यास तो प्रवास ग्राह्य धरला जाणार नसल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते. तशी चर्चाही होती. याबाबत मीडियातून वृत्तही आलं. यामुळे ज्या प्रवाशांनी अगोदर तिकीट काढले आणि त्यांना वेटिंग लिस्ट मिळाली तर काय करायचे? या प्रश्नाने प्रवाशांचे धाबेच दणाणले होते. मात्र, आता तुम्ही बिनधास्त प्रवास करू शकता.
वेटिंग तिकिट, नो प्रवास, अशा प्रकारचे कोणतेही परिपत्रक रेल्वे मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेले नाही. याबाबतची माहिती रेल्वे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकार्या ने दिलेय. कुठलेही परिपत्रक देशभरातील रेल्वेच्या विभागांना दिले नसल्याचे रेल्वे मंत्रालयातील या अधिकार्या ने सांगितले. याबाबत, चुकीची चर्चा झाली असल्याचे या अधिकार्या ने स्पष्ट केले. वेटिंग असताना असा प्रवास रद्द करण्याबाबतचे कुठलेही परिपत्रक काढलेले नाही. त्यामुळे अशा प्रवासास अजूनही मुभा असल्याचे त्यांनी सांगितले.
सूचना नाहीत!
प्रवाशाने तिकिट काढलेय. जर त्याचे नाव वेटिंगवर असेल तर त्याला प्रवास करणे शक्य आहे. वेटिंग असेल तर प्रवास नाही, अशा अजून तरी आम्हाला कुठल्याही प्रकारच्या सूचना रेल्वे मंत्रालयाकडून आलेल्या नाहीत, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी स्पष्ट केलेय. तर पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नितीन डेव्हिड यांनीही, रेल्वे मंत्रालयाकडून आम्हाला असे कुठलेही परिपत्रक आलेले नसल्याचे म्हटलेय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.