मुंबई : गेल्या वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यात शिवाजी पार्कात वाय-फाय सेवा सुरू करण्यावरुन वाद झाल्याचं आपल्याला आठवत असेल. आता मात्र शिवसेना वायफायच्या युद्धात बाजी मारणार असं दिसतंय. कारण, शुक्रवारी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर दक्षिण मुंबईत आठ ठिकाणी वाय फाय सेवेचं उद्घाटन करणार आहे.
दक्षिण मुंबईतील आठ ठिकाणी ही सेवा सुरू होणार असल्याची माहिती शिवसेनेचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी 'डीएनए'शी बोलताना दिली. दक्षिण मुंबईतील चिरा बाजार, हुतात्मा चौक, धोबी तलाव, गिरगाव, खेतवाडी, कुलाबा, मच्छिमार नगर आणि कुलाबा मार्केट या भागांमध्ये ही सेवा सुरू केली जाणार आहे.
या विभागांमध्ये असणारी तरुण मतदारांची संख्या लक्षात घेता या विभागांची निवड केली गेली असल्याची चर्चा आहे. शिवसेना सध्या तरुण मतदारांशी जुळवून घेण्यासाठी विविध पर्याय शोधत आहे. त्याच दिशेने हा एक प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे.
स्थानिक केबल ऑपरेटर्सशी करार करुन ही सेवा सुरू केली जाणार आहे. शिवसेनेच्या गुढीपाडवा शोभायात्रेनंतर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे या सेवेचे उद्घाटन करतील. 'जागर स्त्रीशक्तीचा' अशी या यात्रेची थीम असणार आहे. स्त्रीशक्तीची विविध रुपं यात सादर केली जाणार आहेत.