मुंबई : लव्ह, सेक्स आणि धोका... आणि याचपायी एक आई आपल्याच पोटच्या गोळ्याचा खून करायला मागे पुढे पाहत नाही... इंद्राणीच्या बाबतीतही हेच घडलेलं दिसून येतंय. शीना आपली संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न करतेय, असं वाटल्यानं इंद्राणीला तिचं हत्याकांड घडवून आणलं, असं आता समोर येतंय.
लिव्ह-इनमध्ये राहत होते राहुल आणि शीना
इंद्राणीच्या पहिल्या संबंधांतून जन्माला आलेली शीना आणि इंद्राणीचे पती पीटर मुखर्जी यांच्या पहिल्या लग्नातून जन्मलेला राहुल यांचे प्रेमसंबंध जुळले होते. ही गोष्ट इंद्राणीला मान्य नव्हती. पीटर मुखर्जी यांच्या म्हणण्यानुसार, शीना आणि राहुलनं मुंबईतच एक फ्लॅट घेतला होता. ते दोघे लिव्ह-इनमध्ये राहत होते. राहुल आणि शीना एक वर्षांहून अधिक काळापर्यंत एकमेकांच्या संबंधात होते.
आणखी वाचा - शीना बोरा हत्याकांडाचे कंगोरे
संपत्तीसाठी शीनानं जोडले राहुलशी संबंध
पोलिसांच्या अटकेत असलेल्या ड्रायव्हर श्याम रायनं दिलेल्या माहितीनुसार, इंद्राणीनंच त्याला शीनाचा हत्येची सुपारी दिली होती. यावेळी, शीनाचा आपल्या संपत्तीवर डोळा असल्यानंच तिचं राहुलसोबत अफेअर सुरू असल्याचं इंद्राणीनं त्याला म्हटलं होतं. इंद्राणी आणि शीनाचे संबंध अजिबात चांगले नव्हते.
कसा लागला पोलिसांना सुगावा?
पोलिसांच्या एका खबऱ्यानं या प्रकरणाची थोडीफार सूचना पोलिसांना दिली होती. त्यानंतर, पोलिसांनी ड्रायव्हरला अटक केली. त्याच्या चौकशीत ड्रायव्हरनं हे प्रकरण पोलिसांसाठी आणखी सोप्पं केलं.
अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह स्थानिक पोलिसांनी अज्ञात म्हणून नोंद केली होती. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली असली तरी पोलिसांनी त्याचे 'डीएनए' पुरावे म्हणून जपून ठेवले आहेत.
पोलीस गोळा करतायत पुरावे
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्राणीचा पासपोर्ट, लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आलाय. पोलीस आणखी ठोस पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.