www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
आपल्याला जसं कमीत-कमी वन बीएचके घर तरी असावं, असं वाटतं. तर मग प्राण्यांना का नाही? मुंबईत आता प्राण्यांसाठी खास अशी वन बीएचके घरं बनणार आहेत. हे चित्र आपल्याला दिसेल ते मुंबईतल्या जीजामाता उद्यानात.
जीजामाता उद्यानातील प्राण्यांना सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा मोठ्या घरात आता जाता येणार आहे. प्राण्यांना झोपण्यासाठी, जेवण्यासाठी, शतपावली करण्यासाठी, प्रायव्हसीसाठी विशिष्ट पिंजऱ्याची १२ डिझाइन्स प्राणीसंग्रहालयानं तयार केली आहेत. सेंट्रल झू अथॉरिटीकडं ही डिझाइन्स मान्यतेसाठी पाठवण्यात आली आहेत.
जिजामाता उद्यान प्राणिसंग्रहालयाकडून पालिकेच्या बाजार आणि उद्यान समितीमध्ये सादर करण्यात आलेल्या एका अहवालात, या प्राणिसंग्रहालयात नवीन कोणते प्राणी येणार आहेत, त्यात कोणकोणत्या सुधारणा करण्यात येणार आहेत याची माहिती देण्यात आली आहे. मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून मान्यता मिळाल्यानंतर निविदा काढून २०१५ पर्यंत अद्ययावत प्राणिसंग्रहालय तयार होईल, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.
जसं घराला संपूर्ण कुटुंब हवं असतं तसंच प्राणिसंग्राहलयात एकट्या प्राण्याला नाही तर जोडीला प्रवेश मिळणार आहे. शिवाय नवीन पिंजऱ्यांमध्ये प्रत्येक प्राण्याच्या नैसर्गिक गरजा पूर्ण करणार्याय सोयीसुविधांचा समावेश करण्यात आलाय.
नवीन पिंजऱ्यांमध्ये प्रत्येक प्राण्यांच्या गरजेनुसार बदल करण्यात येणार आहेत. वाघ, सिंह या प्राण्यांच्या पिंजऱ्यांत छोटीशी पाण्याची तळी, त्यांचं खाद्य साठवण्यासाठी वेगळी जागा, त्यांना शतपावली घालण्यासाठी वेगळी जागा, तसंच त्यांना अंग घासता येईल असं विशिष्ट लॅण्डस्केप असतील. तर पक्ष्यांसाठींच्या पिंजऱ्यांत प्रत्येक जोडीसाठी प्रायव्हसी देणारी जागा असेल.
नवीन नियमानुसार प्राणिसंग्रहालयात हत्ती, हिमालयीन ब्लॅक बेअर ठेवता येणार नाहीत. तर इथं नव्यानं येणार्या प्राण्यांमध्ये देशी अस्वल, झेब्रा, हंबोल्ड पेंग्विन, बाराशिंगा यांचा समावेश करण्यात आलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.