मुंबई : आता कामवाल्या बाईच्या कटकटीपासून मुक्ती...आता चुटकीसरशी पुसली जाणार लादी...होय... तुम्ही ऐकताय ते खरंय ! जमीन स्वच्छ करणारं हे नवं यंत्र बाजारात आलंय. हा एक प्रकारचा यंत्रमानवच आहे. आयरोबो आणि प्युअरसाईट सिस्टिम यांनी हा लादी पुसणारा मॉपिंग रोबो ब्रावा जेट तयार केलाय.
याची मूर्ती लहान असली, तरी लादी स्वच्छ करण्यात त्याची कीर्ती महान आहे. या रोबोमध्ये आपल्याला थोडंस पाणी घालायचंय आणि 'क्लीन'चं बटण दाबायचंय.. बस्... झालं काम... पुढची सगळी स्वच्छता हा रोबो स्वतःच करतो. त्याच्यावर असलेले मॉपिंग पॅड्स बदलणं सोपं आहे.
विशेष म्हणजे, आपण ब्लूटूथद्वारे मोबाईल अॅपशी रोबो जोडला जाऊ शकतो. म्हणजे बसल्या जागेवरून तुम्ही या रोबोला कंट्रोल करू शकता... तो भिंतीवर आपटणार नाही किंवा उंचीवरून पडणार नाही याची काळजी त्याच्यावर बसवलेले सेन्सर्स घेतात...
हा यंत्रमानव बॅटरीवर चालतो. एकदा फूल चार्ज झाल्यावर तो 25 चौरस मीटर लादी स्वच्छ करू शकतो. मोबाईल अॅपवर एकाच वेळी अनेक रोबो कनेक्ट होऊ शकतात. विशेष म्हणजे, हा सर्वसामान्यांना परवडणारा आहे. 19 हजार 900 रुपये किंमतीचं हे यंत्र 1 जूनपासून भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होईल...
घरात लहान मूल असेल, तर वारंवार लादी खराब होणं हे ठरलेलंच... या रोबोमुळे घर स्वच्छ ठेवण्याची गृहिणींची मोठी डोकेदुखी कमी होणार आहे... घरात मोठी मेजवानी झाली असेल, तर मग या रोबोचं महत्त्व सांगायलाच नको... अगदी कामवाल्या बाईइतकाच हा रोबोही गृहिणींचा लाडका होईल...