www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
घाटकोपर रेल्वे स्थानकात झालेल्या अपघातात मोनिका मोरे नावाच्या तरूणीला आपले हात गमवावे लागले. मोनिका मोरेवर कोसळलेल्या या आपत्तीमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असताना, ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांना मात्र या दुर्दैवी जखमी तरूणीला भेटायला वेळ नाही.
तिची चौकशी करण्याऐवजी स्वतःच्या वाढदिवसाची तयारी करण्यात मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेले हे खासदार महोदय बिझी आहेत. या तरूणीची साधी विचारपूस करायला ते हॉस्पिटलमध्ये फिरकले नाहीत की तिच्या कुटुंबाची भेट घेण्याचं साधं सौजन्य त्यांनी दाखवलं नाही, अशा खासदारांबद्दल काय बोलायचं, असा संताप स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
मोनिका मोरे
मोनिका मोरे, 16 वर्षांची ही हरहुन्नरी मुलगी सध्या केईएम हॉस्पिटलच्या बेडवर पडून आहे. सुंदर हस्ताक्षर ही एसएनडीटी कॉलेजमध्ये शिकणा-या मोनिकाची ओळख.उत्कृष्ट डान्सर म्हणूनही ती नावाजलेली होती... शिवाय इतरांच्या हातावर मेहंदी काढण्यात तिचा हात धरणारं कुणीही नव्हतं.
अपघात
कुर्ल्याच्या नेहरूनगर भागात राहणा-या या अवघ्या 16 वर्षांच्या जीवावर अचानक मोठा आघात झाला. गेल्या शनिवारी घाटकोपर रेल्वे स्टेशनमध्ये लोकल ट्रेन पकडण्याच्या नादात मोनिकाचा पाय घसरला आणि ती धावत्या ट्रेनखाली आली. या दुर्दैवी अपघातात तिला आपले दोन्ही हात गमवावे लागलेत.
हात गमावल्याने मानसिक धक्का
मोनिकावर सध्या केईएम हॉस्पिटलच्या ऑर्थोपेडिक वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. तिच्या जखमा भरण्यासाठी दोन ते चार महिने लागणार आहेत. त्यानंतर तिला कृत्रिम हात बसवता येतील का, यादृष्टीने डॉक्टर प्रयत्नशील आहेत.
महिला आयोगाच्या सदस्या चित्रा सावंत यांनी तिची भेट घेऊन, मुख्यमंत्री निधीतून आर्थिक मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलंय. परंतु आपले दोन्ही हात गमावल्यानं मोनिकाला मोठा मानसिक धक्काही बसलाय, अशा परिस्थितीत तिच्या जखमा ब-या करतानाच, तिला मानसिक आधार देण्याची काळजी डॉक्टर घेतायत.
रेल्वे प्रशासनावर आरोप
मोनिकाच्या अपघाताला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप केला जातोय. मोनिकाच्या उपचारांची आणि भविष्यातील नोकरीची जबाबदारी रेल्वेने घ्यावी, अशी मागणी तिच्या पालकांनी केलीय.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा सोमय्या यांनी देखील या दुर्घटनेसाठी रेल्वे प्रशासनावरच ठपका ठेवलाय.
लोकलपेक्षा रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची कमी असल्याने अशाप्रकारचे अपघात होत आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी कांजूरमार्ग आणि घाटकोपर रेल्वे स्थानकावर मोर्चा काढून प्लॅटफॉर्मची पाहणी केली. यावेळी प्लॅटफॉर्मवची उंची, खड्डे आणि त्यामुळे घडणारे अपघात या सर्व गोष्टींची पाहणी किरीट यांनी केली. याप्रकरणी रेल्वे प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केलीय.
प्रशासन कधी जागे होणार?
मोनिका मोरेच्या अपघातानंतर तरी कोडगे रेल्वे प्रशासन जागे होईल का, हा मोठा प्रश्नच आहे. मात्र त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे म्हणजे मोनिका या धक्क्यातून कशी सावरणार..? कारण सुंदर हस्ताक्षर ही तिची ओळख आता कायमची पुसली जाणार आहे.
कदाचित ती आता पहिल्यासारखी नाचूही शकणार नाहीये.. आणि इतरांच्या हातांवर सुंदर सुंदर मेहंदी काढणारे हातच आता कायमचे हिरावले गेल्यानं आता मेहंदी कशी रंगणार, हा प्रश्नच आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.