मुंबई : बाटलीबंद पाणी (मिनरल वॉटर) आणि कोल्ड्रिंगसाठी छापील किमतीपेक्षा दोन रुपये अधिक दुकानदारांना घेता येणार नाहीत. यापुढे दुकानदाराने असे केले तर दुकानरांबरोबरच कंपनीला दंड ठोठवण्याचा निर्णय झालाय.
बाटलीबंद पाणी थंड ठेवण्यासाठी लागणारे शुल्क म्हणून छापील किमतीपेक्षा दोन रुपये अधिक दुकानदार घेत होते. याला आता चाप लावला जाणार आहे. दुधाच्या किमतीबाबत यापूर्वी कारवाई सुरु केलेल्या वैधमापन विभागाने आता बाटलीबंद पाणी व त्यानंतर शीतपेयांच्या (कोल्ड्रिंग) प्रत्येक बाटलीसाठी दोन रुपये जादा उकळणाऱ्या दुकानदारांवर कारवाईचा करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईसह राज्यात रोज लाखो लिटर बाटलीबंद पाणी विकत घेतले जाते. भर उन्हात थंडगार पाण्याची मागणी केल्यावर दुकानदार बाटली थंड ठेवण्याचे शुल्क म्हणून छापील किमतीपेक्षा दोन रुपये जादा घेतो. या पद्धतीने दिवसभरात दोन लाख रुपयांहून अधिक रक्कम कोणत्याही हिशेबाविना जमा होते. अधिकतर मूल्यापेक्षा (एमआरपी) जास्त किंमत घेतली जाऊ नये, असे कायद्यात स्पष्ट केले असतानाही गेली अनेक वर्षे ही लुबाडणूक सर्रास सुरु आहे.
वैधमापन विभागाचे नियंत्रक संजय पांडे यांनी यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. किरकोळ विक्रेत्यांपेक्षाही अधिक नफा कमावणाऱ्या वितरक व कंपन्यांकडे याचा दोष जातो. त्यांनी वेळीच पावले उचलून ग्राहकांकडून जास्त पैसे घेणे थांबवले नाही, तर या दोघांनाही आरोपी करण्याचा आमचा विचार आहे, असे संजय पांडे यानी स्पष्ट केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.