www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आपलं प्रेम नाकारल्याचा राग येऊन एका तरुणाने आपल्या मैत्रिणीची हत्या केली. इतकंच नव्हे, तर तरुणीची ओळख पटू नये, म्हणून तिचं प्रेत जाळण्यात आलं आणि यानंतर आपल्याला यासंदर्भात माहितीच नसल्याचं दर्शवण्यासाठी तरुणाने मुलीच्या मोबाईलवर व्यवस्थित घरी पोहोचलीस का? असं विचारणारे दोन मॅसेजही तिला केले. मात्र अखेर या तरुणाला क्राईम ब्राँचने अटक केली.
घाटकोपरच्या अमृतनगर येथे राहणारी विभुती संपत ही तरुणी गोरेगावच्या एका गारमेंट कंपनीत फॅशन डियायनर होती. जुहू येथे राहणाऱ्या गौतम भरूच याच्याशी तिची मैत्री होती. शनिवारी विभुती आणि गौतम बॅण्डस्टॅण्ड येथे फेरफटका मारून गौतमच्या घरी गेले आले होते. तिथे गौतमने विभुतीला लग्नाची मागणी घातली. मात्र विभुतीने त्याला नकार दिला. जेव्हा त्याने विभुतीशी लगट करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा चिडलेल्या विभुतीने आरडाओरडा सुरू केला.
यावर गौतमने संतापून आणि घाबरून विभुतीचा गळा आवळून तिची ठार मारलं. इंटिरिअर डिझायनर असलेल्या गौतमने घरातल्या एका बॉक्समध्ये तिचा मृतदेह कोंबला. स्वतःच्या गाडीने तो बॉक्स पवई येथे घेऊन गेला. तिथे पालापाचोळा आणि थिनर टाकून त्याने मृतदेह जाळला. त्या दिवशी विभुतीने मोबाइलवरून गौतमशी बोलणे झाले होते. त्यामुळे त्याला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले.
आपल्या घरून निघाल्यानंतर विभुतीला वाटेत कोणीतरी ठार मारले असावे, असा दावा गौतम सुरुवातीला करत होता. ती घरी पोहचली का, अशी विचारणा करणारे एसएमएसही धाडल्याचे सांगत त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चौकशी अंती गौतमने आपला गुन्हा कबूल केला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.