मुंबई : मुंबई साखळी बॉम्ब स्फोटातील दोषी याकूब मेमन याला फाशी दिल्यानंतर त्याच्या दफनविधीसाठी मुंबईत झालेली गर्दी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या इशाऱ्यावर जमा झाली होती. मुंबई पोलिसांनी याचा दावा केला आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाऊदने स्वतः मुंबईतील आपल्या एकनिष्ठ असलेल्या व्यक्तींना फोन करून मोठ्या संख्येत याकूबच्या दफनविधीत उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते.
मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर वरील माहिती दिली. त्यांनी सांगितले की, दाऊद आणि त्याचा साथीदार छोटा शकील याने मुंबईतील आपल्या अनेक सहकाऱ्यांना आणि एकनिष्ठ व्यक्तींना फोन करून याकूबच्या दफनविधीसाठी जास्त जास्त जण उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहे.
याकूबच्या दफनविधीसाठी त्याच्या माहिमच्या केडल रोड भागातील घराजवळ १० हजारांपेक्षा अधिक लोक जमले होते. हे लोक दाऊदच्या इशाऱ्यावर जमले होते. तसेच १० हजारांच्या आसपास लोक मरीनलाइन्स येथील बडा कब्रिस्थान या ठिकाणी उपस्थित होते.
३० जुलै रोजी याकूबला फाशी दिल्यानंतर छोटा शकीलने फोन करून सविस्तर याकूब प्रकरणी एक इंटरव्ह्यू दिला होता. त्यानंतर त्याने अप्रत्यक्षपणे याच्या परिणामांना सामोरे जाण्याचा इशारा दिला होता. शकीलची ही धमकी यातून स्पष्ट करते की त्याचा १९९३ च्या मुंबई बॉम्ब स्फोटात हात होता. त्यानंतर नुकताच टायगर मेमन याने मुंबईत राहत असलेल्या आपल्या आईला फोन करून याकूबच्या फाशीचा बदला घेण्याची धमकी दिली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.