मुंबई : न्हावाशेवा-शिवडी म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) सागरी लिंक प्रकल्पाचा खर्च १० हजार कोटी रुपयांवरुन वाढून आता १८ हजार कोटींवर गेलाय. तब्बल आठ हजार कोटींचा खर्च वाढल्याचं सांगण्यात येतंय.
गेल्या काही वर्षांत प्रकल्पाला झालेला विलंब, भर समुद्रात स्टीलचे खांब उभे करण्याचा निर्णय, सहा लेनच्या समुद्र सेतूवर सुरक्षेसाठी दोन्ही बाजूला पाच मीटरची जागा वाढवण्याचं ठरल्यामुळं या प्रकल्पाचा खर्च वाढल्याचं सांगितलं जातंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या प्रकल्पाचा आढावा घेतला. त्यावेळी ही बाब समोर आली. या प्रकल्पाबाबत पंतप्रधानांनी राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याशी चर्चा केली.
२२ किमीचा हा समुद्र सेतू बांधण्यासाठी परवानगीचे सर्व अडथळे दूर झाले असून, मार्च महिन्यात या प्रकल्पाला कर्ज देणाऱ्या जपानच्या जायका कंपनीबरोबर प्राथमिक करार करण्यात येणार आहे. त्यानंतर निविदा प्रक्रिया सुरु करून वर्ष संपण्याआधी प्रत्यक्ष बांधकामाला सुरूवात होईल. साडेचार वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे.