मुंबई : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दीपक देशपांडे यांच्या घरावर छापा टाकला आहे, हा छापा शनिवारी रात्री टाकण्यात आला. देशपांडे यांच्या घरात मोठ्या प्रमाणात संपत्ती सापडली आहे.दीपक देशपांडे राज्याचे माहिती आयुक्तपदी काम करतात.
देशपांडे यांच्या मुंबई आणि औरंगाबादमधील घरांवर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या छाप्यात त्यांच्याकडे प्रचंड संपत्ती असल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती एसीबीचे अतिरिक्त पोलिस आयुक्त किशोर जाधव यांनी दिलीय.
देशपांडे यांची आज दुपारपर्यंत संपत्ती मोजण्यात येणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि औरंगाबादमध्ये त्यांच्या नावावर संपत्ती आहे.
प्राथमिक चौकशीनुसार, दोन दुकाने, पुणे आणि औरंगाबादमध्ये पाच एकर जमीन, दीड किलो सोने, २७ किलो चांदी, अडीच कोटींचे फिक्स डिपॉझिट आणि विविध योजनांमध्ये गुंतविलेले सुमारे ६ हजार शेअर्स हे सर्व सापडले आहे.
महाराष्ट्र सदन बांधकाम विभागातील गैरव्यवहारप्रकरणी एसीबीने ही कारवाई केली आहे. माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर देशपांडेंचे नाव समोर आले होते. दीपक देशपांडे हे तत्कालीन बांधकाम सचिव होते.
महाराष्ट्रातील कित्येक मोठे प्रकल्प जसे पुणे सातारा रस्त्यावरील खंबाटकी टोल, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, मुंबई अहमदाबाद गोल्डन कबॉड्रंगल चारपदरी रस्त्याचे काम, वरळी बांद्रा सिलिंकचे प्रशासन अशी कामं त्यांनी केली आहेत. देशपांडे त्यांची १५ ऑक्टोबर, २०१० पासून राज्य माहिती आयुक्त या पदावर नियुक्ती झाली असून ते औरंगाबाद विभागाचा कार्यभार सांभाळत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.