www.24taas.com, मुंबई
कृषीप्रधान महाराष्ट्र अशी शेखी मिरवणा-या महाराष्ट्राचं वास्तवातल चित्र मात्र गंभीर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहेत. दोन लाख २६ हजार कोटी रुपयांचं कर्ज डोक्यावर असलेल्या महाराष्ट्राची कृषीक्षेत्रात पिछेहाट झाल्याचं वास्तव आर्थिक पाहणी अहवालाच्या आकडेवारीत समोर आले आहे.
काय आहेत ठळक बाबी
महाराष्ट्राची शेती क्षेत्रातही पिछेहाट !
अन्नधान्याचं उत्पादन घटलं !
राज्यावर 2 लाख 26 हजार 926 कोटींचं कर्ज !
देशातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य असा लौकिक याआधी मिरवणा-या महाराष्ट्रावर तब्बल २ लाख २६ हजार ९२६ कोटीचं कर्ज आहे. महाराष्ट्राची उद्योगात पुढे असल्याचा दावा सरकारनं काही दिवसांपूर्वीच केला खरा, पण आता शेतीत राज्याची पिछेहाट होत असल्याचं धक्कादायक वास्तव विधिमंडळात सादर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालात समोर आलंय. कृषी क्षेत्रात ९.१टक्के इतकी घट झालीय आणि अन्नधान्य उत्पादन तब्बल २३ टक्क्यांनी घटलंय.
पिकाखाली असलेलं क्षेत्रही शहरीकरणामुळे कमी झालंय. कृषीक्षेत्रात झपाट्यानं होणारी ही घट राज्यासाठी चिंताजनक बाब ठरण्याची चिन्हं आहेत. कर्जाचा बोजा, वाढता महसुली खर्च, स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात झालेली घट, उद्योग आणि सेवा क्षेत्रात झालेली घसरण, चलनवाढ या साऱ्यांचा परिणाम महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीवर झाला आहे. राज्यातील कृषी क्षेत्रात तब्बल नऊ टक्के एवढी चिंताजनक पीछेहाट झाल्याचेही राज्याच्या आर्थिक पाहणीतून निष्पन्न झाले आहे. महसुली उत्पन्न वाढवून कर्जाचा बोजा कमी करावा, या एका ओळीच्या सल्ल्यातच राज्याच्या आर्थिक स्थितीचे सार विधिमंडळात सादर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालातून स्पष्ट झाले.