UNBELIEVABLE : दहावी शिकलेल्या 'शहाण्या'नं उच्च शिक्षितांना घातला गंडा!

कृषी विद्यालयाच्या नावाखाली सुशिक्षित युवक आणि विद्यार्थ्यांची राज्यात फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय. राष्ट्रीय मागासवर्गीय खुले कृषी विद्यालयाच्या नावाखाली एका दहावी शिकलेल्या व्यक्तीनं या विद्यार्थ्यांना गंडा घातलाय.

Updated: Sep 16, 2015, 04:56 PM IST
UNBELIEVABLE : दहावी शिकलेल्या 'शहाण्या'नं उच्च शिक्षितांना घातला गंडा! title=

बुलडाणा : कृषी विद्यालयाच्या नावाखाली सुशिक्षित युवक आणि विद्यार्थ्यांची राज्यात फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय. राष्ट्रीय मागासवर्गीय खुले कृषी विद्यालयाच्या नावाखाली एका दहावी शिकलेल्या व्यक्तीनं या विद्यार्थ्यांना गंडा घातलाय.

अण्णाराव इसुरे असं या इसमाचं नाव आहे. याच इसुरेच्या भूलथापांना बळी पडून अनेक सुशिक्षित युवक आणि विद्यार्थ्यांचं भविष्य अंधकारमय झालंय. केंद्र सरकारमार्फत १०० टक्के अनुदान तत्त्वावर राज्यभर कृषी विद्यालय वाटप करण्यात येणार असल्याची जाहिरात सोलापुरच्या बहुउद्देशीय संस्थेचा अध्यक्ष अण्णाराव इसुरेनं केली. त्यानंतर अनेक शिक्षण सम्राट आणि उच्चशिक्षित युवकांनी त्यांच्याशी संपर्क साधला.

त्याच्या भुलथापांना बळी पडून कुठलिही शहानिशा न करता कृषी विद्यालय सुरु केलं. त्यासाठी या संस्थाचालकांनी इसुरेंना २० लाखांपासून ते एक कोटी रुपये अनामत म्हणून दिले. १०० टक्के अनुदान, शिष्यवृत्ती अशा गोष्टींचं आमिष दाखवल्यानं अनेकांनी कर्ज काढत कोट्यवधी खर्च करुन विद्यालय स्थापन केली... इमारती बांधल्या... स्टाफही भरला... केंद्र सरकार संचालित विद्यालयावर नोकरी मिळत असल्यानं अनेक सुशिक्षित युवकांनी लाखो रुपये देऊन नोकऱ्या मिळवल्या. इसुरेनं २००९ पासून ६०-७० विद्यालयं वाटप केलीत. मात्र, गेल्या सहा वर्षात एकाही विद्यालयाला अनुदान मिळालंच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

हे सारं बनावट असल्याची शंका बुलडाण्यात साखळी इथल्या मागासवर्गीय खुले कृषी विद्यालयाचे संचालक तथा प्राचार्य आशिष डोक यांना आली. त्यांनी यासंदर्भात शिक्षणमंत्री तावडे आणि एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधला. मात्र या विद्यालयांच्या वैधतेबाबत त्यांच्याकडून कोणतीही माहिती मिळाली नसल्याचा आरोप डोक यांनी केलाय.

इसुरेचा बोगसपणा उघड... 
अण्णाराव इसुरे दहावी पास... जून २०१५ मध्ये बोगस विद्यालय वाटपप्रकरणी जेलची हवा खाल्लीय. राज्यात आणि राज्याबाहेर बोगस कृषी विद्यालय स्थापन करुन कोट्यवधींची माया जमवलीय. राजमुद्रेचा वापर करुन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बनावट शिफारस पत्र बनवल्याचा आरोपही इसुरेवर आहे. त्यानं अनेक शिक्षणसम्राटांना ठगवलंय. तो बोलतो त्यावेळी एखादा शिक्षणतज्ज्ञ असल्याचं भासतं.

अण्णा इसुरेनं राज्यभर वाटप केलेली ६० ते ७० विद्यालयं बोगस असल्याचं समोर आलंय. त्यामुळं लाखो खर्च करुन तिथं विविध पदावर काम करणाऱ्या  युवकांना पगारच मिळालेला नाही तर हजारोंनी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पदव्याच बोगस निघाल्यात.

या सगळ्या प्रकाराबाबत इसुरेची बाजू जाणून घेण्यासाठी सोलापूर गाठलं. मात्र तिथं त्याचा मुलगा आणि बहिणीनं 'झी २४ तास'च्या टीमला धमकावण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे जळगाव पोलिसांतही इसुरेविरोधात गुन्हा दाखल आहे. इसुरे ९० दिवस अटकेतही होता, अशी माहिती पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप सिनगारे यांनी दिलीय. 

गेल्या ५ ते ६ वर्षांपासून इसुरेकडून राज्यात खुलेआम बोगस कृषी विद्यालयांचा सुळसुळाट सुरु आहे. स्वतः संस्थाचालकानं शिक्षण मंत्री आणि कृषी मंत्र्यांकडे याबाबत दाद मागितलीय. तरी इसुरेवर कुठलीच कारवाई का करण्यात आली नाही? इसुरेवर कुणाचा वरदहस्त आहे असा सवाल उपस्थित करण्यात येतोय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.