झी स्पेशल : जोडीदारावर जीव ओवाळून टाकणारा सारस पक्षी!

केवळ गोंदियात आढळणाऱ्या सारस पक्षाचं अस्तित्व आज धोक्यात आलंय. दुर्मिळ असलेल्या सारसच्या संवर्धनासाठी गोंदियात वन विभागानं कंबर कसलीय. यासाठी खास महोत्सव आयोजित करण्यात आला असून जनजागृतीही करण्यात येत आहे. 

Updated: Dec 26, 2015, 04:08 PM IST
झी स्पेशल : जोडीदारावर जीव ओवाळून टाकणारा सारस पक्षी! title=

माधव चंदनकर, गोंदिया : केवळ गोंदियात आढळणाऱ्या सारस पक्षाचं अस्तित्व आज धोक्यात आलंय. दुर्मिळ असलेल्या सारसच्या संवर्धनासाठी गोंदियात वन विभागानं कंबर कसलीय. यासाठी खास महोत्सव आयोजित करण्यात आला असून जनजागृतीही करण्यात येत आहे. 

हा आहे अत्यंत दुर्मिळ असलेला सारस पक्षी... महाराष्ट्रात केवळ गोंदिया जिल्ह्यात हा आढळतो. सारसमुळंच गोंदियाच्या निसर्ग सौंदर्याचं वेगळेपण सतत जाणवत असतं. निसर्गाचं वरदान लाभलेल्या गोंदिया जिल्ह्यात वन्यजीवांचं मोठ्या संख्येनं वास्तव असतं.  देश-विदेशातले पक्षीही गोंदियाची सफर करण्यासाठी दरवर्षी दाखल होत असतात. मात्र सारसचं वेगळेपण सर्वांमध्ये उठून दिसतं. या दुर्मिळ सारसच्या संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनानं ठोस पावलं उचलली आहेत. 

सारसचं खास वैशिष्ट्य म्हणजे हा पक्षी एकदाच आपला साथीदार निवडतो आणि आयुष्यभर त्याच्याच सहवासात राहतो. एकाचा मृत्यू झाल्यास दुसरा जोडीदारही अन्न पाण्याचा त्याग करून मृत्युला कवटाळतो. प्रेमाप्रती त्याची ही निष्ठा आपल्यालाही काहीतरी शिकवून जाणारी आहे. 


'निष्ठावान प्रेमी' 

विशेष म्हणजे, सारसचा अधिवास अभयारण्यात नसून गावालगतच्या धानाच्या शेतात असतो. त्याच ठिकाणी तो एक किंवा दोन अंडी घालतो. मात्र, माणसांच्या जवळ राहणंच त्याच्या ऱ्हासाचं मुख्य कारणही ठरलंय.

सारस संवर्धनासाठी जिल्हा पर्यटन समितीनं गावा-गावात जनजागृती घडवून आणलीय. ज्या शेतांमध्ये सारसचा अधिवास आहे त्याठिकाणी किटकनाशक वापरावर प्रतिबंध घालण्यात आलाय, अशी माहिती गोंदिया वनविभागातील उपवन संरक्षक जितेंद्र राम गावकर यांनी दिलीय.  

गोंदिया जिल्ह्यात सध्या ३२ ते ४० च्या आसपास सारस आहेत. ही संख्या शेकडोंवर जाण्यासाठी १५ डिसेंबर ते ३० जानेवारी दरम्यान गोंदिया जिल्ह्यात
सारस महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यामुळं सारसचे संशोधकही उपस्थिती लावत असून गोंदियातल्या पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे. मात्र यामागचा मुख्य हेतू आहे तो 'निष्ठावान प्रेमी' सारसला जगवण्याचा...